Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

देशाला कर्जबाजारी देशांच्या रांगेत उभे करणाऱ्या मोदींना इतिहासाचे कमी आकलन असल्याने ते ७० वर्षात काय केले असा प्रश्न विचारतात : पवार

Spread the love

इतिहासाचे आकलन कमी असलेले नरेंद्र मोदी आम्ही ७० वर्षात काय  केले असा प्रश्न विचारतात . राज्य आणि देशात उत्तम कारभार करण्याची कुवत फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापासून ते मनमोहन सिंग यांच्यापर्यंत त्या क्षमता सिद्ध झाल्या आहेत. मागील सत्तर वर्षांच्या कालावधीत एक समृद्ध देश म्हणून आपण स्वतःची ओळख निर्माण केली. असे म्हणत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी मोदींवर आणि भाजपावर टीकास्त्र सोडले.

उस्मानाबाद या ठिकाणी राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील, माजीमंत्री आमदार मधुकरराव चव्हाण, माजी आमदार सि. ना. आलुरे गुरूजी, कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आमदार बसवराज पाटील, अशोक पाटील निलंगेकर, राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ, राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, कॉंगे्रसचे जिल्हाध्यक्ष प्रशांत चेडे, आमदार राहुल मोटे, शिक्षक आमदार विक्रम काळे, माजी आमदार नरेंद्र बोरगावकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले की, पुलवामा प्रकरणाचे आम्ही कधीच राजकारण केले नाही. मात्र भाजपा आणि नरेंद्र मोदी यांच्या वायफळ गप्पा पाहून शहिद सैनिकांच्या कुटुंबीयांनी राजकीय फायदा घेणे थांबवा, अशा शब्दात कान उघडणी केली. अभिनंदन यांना पाकिस्तानच्या तावडीतून सोडवून आणल्याच्या थापा मारणारे कुलभूषण जाधव यांचे नाव आले की, ५६ इंचाची छाती १५ इंचाची करून घेतात. सैनिकांनी गाजविलेल्या शौर्याचे श्रेय लाटू नका. २०१४ पासून आजवर किती हल्ले झाले ? त्यात किती जणांना जीव गमवावे लागले ? याची माहिती जाहीर करण्याचे धाडस या सरकारमध्ये नाही. देशावर मागील ७० वर्षात पावणे तीन लाख कोटी रूपयांचे कर्ज होते. मागील पाच वर्षांत त्यात कमालीची वाढ झाली आहे. हे कर्ज आता ५ लाख ४० हजार कोटींच्या घरात पोहचले आहे. त्यामुळे जगातील कर्जबाजारी देशांच्या रांगेत या सरकारने आपल्याला नेवून ठेवले आहे. आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या मुलांना बेवारस म्हणून अपमान करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही असंही त्यांनी म्हटलं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!