Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

‘जैश-ए-मोहम्मद’चा दहशतवादी निसार अहमद तांत्रे यूएईने दिला भारताच्या ताब्यात

Spread the love

संयुक्त अरब अमीरातने (यूएई) पाकिस्तानातील दहशतवादी संघटना ‘जैश-ए-मोहम्मद’चा दहशतवादी निसार अहमद तांत्रे याला भारताच्या ताब्यात दिले आहे. ‘जैश’चा हा दहशतवादी जम्मू-काश्मीरमधील लेथपोरा येथे सीआरपीएफच्या तळावर डिसेंबर २०१७मध्ये झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाइंड आहे. ३०-३१ डिसेंबर, २०१७ मध्ये झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात ५ जवान शहीद झाले होते. त्यावेळी तिन्ही हल्लेखोरांना ठार करण्यात आले होते.
निसार तांत्रे हा जैशच्या दक्षिण काश्मीरचा विभागीय कमांडर नूर तांत्रे यांचा भाऊ आहे. निसारला विशेष विमानाने दिल्लीत आणले गेले. त्यानंतर त्याला राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआय) ताब्यात देण्यात आले. एनआयए कोर्टाच्या विशेष न्यायाधीशांनी निसारविरोधात अटक वॉरंट जारी केले होते. याच आधारे त्याला यूएईकडून भारतात आणले गेले. नूर तांत्रे यानेच जैश-ए-मोहम्मद या संघटनेला काश्मीर खोऱ्यात जम बसवायला मदत केली असे मानले जाते. नूरला डिसेंबर २०१७ मध्ये ठार करण्यात आले.

गेल्या काही वर्षांपासून यूएईने फरारांना भारताच्या ताब्यात द्यायला सुरू करत जगापुढे एक उदाहरण निर्माण केले आहे. यात काही दहशतवाद्यांचाही समावेश आहे. यूएईने आतापर्यंत ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणात लाच खाण्याचा आरोप असलेला आरोपी ख्रिश्चियन मिशेल, या प्रकरणातील कथित दलाल दीपक तलवार यांच्या व्यतिरिक्त दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटचे समर्थक, इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी अब्दुल वाहिद सिद्दिबापा आणि १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी फारूख टकलासारख्या दहशतवाद्यांना भारताच्या ताब्यात दिले आहे. निसार तांत्रे याच वर्षी भारतातून यूएईला पळून गेल्याचे सांगितले जात आहे.

लेथपोरा प्रकरणातच पुलवाम्याच्या अवंतीपुराचा रहिवासी फय्याज अहमद मॅग्रे याला फेब्रुवारीत अटक करण्यात आली आहे. या हल्ल्यात त्रालचा फरदीन अहमद खांडे, पुलवाम्यातील द्रुबग्रामचा रहिवासी मंजूर बाबा आणि पाकिस्तानी दहशतवादी अब्दुल शकूर यांना ठार करण्यात आले होते. शकूर हा पाकव्याप्त काश्मीरच्या रावलकोटचा रहिवासी होता. एनआयने फेब्रुवारीत अटक केलेला फय्याज हा दहशतवादी हा जैश-ए-मोहम्मदचा सक्रिय सदस्य होता. फय्याजने हल्ल्यात सहभागी दहशतवाद्यांना लपण्यासाठी जागा, हत्यारे आणि गुप्त माहिती उपलब्ध केली होती.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!