Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

लोकशाहीप्रमाणेच भारताची धर्मनिरपेक्षताही धोक्यात , बुद्धिभ्रम करण्याचे षड्‌यंत्र : नयनतारा सहगल

Spread the love

‘प्रतिगामी विचार करणाऱ्या ‘नवीन भारता’मध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याला जागा उरलेली नाही. मते मांडण्याचा सामान्यांचा अधिकार हिरावून घेण्यात आला आहे. सरकारविरोधात लिहिणाऱ्यांच्या हत्या होत आहेत. देशात पसरवली जाणारी विषमता हिंदू आणि इतर अशी नसून हिंदुत्वमानणारे आणि न मानणारे अशी आहे. धर्मनिरपेक्ष देशाला हिंदू राष्ट्र अशी ओळख देण्याची धडपड सुरू आहे. हिंदुत्वाला विरोध करणाऱ्यांना देशद्रोही ठरवले जात आहे,’ अशा शब्दांत आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या लेखिका नयनतारा सहगल यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

आरोग्य सेना आणि भाई वैद्य फाउंडेशन यांच्यातर्फे ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त ‘लोकनेते भाई वैद्य स्मृती गौरव पुरस्कार’ सहगल यांना प्रदान करण्यात आला. प्रकृती अस्वस्थ्यामुळे प्रत्यक्ष उपस्थित राहू न शकल्याने सहगल यांनी दृकश्राव्य पद्धतीने मनोगत मांडून मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली. ख्यातनाम लेखक किरण नगरकर यांनी सहगल यांच्या वतीने पुरस्कार स्वीकारला. ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव, समाजवादी नेते पन्नालाल सुराणा, डॉ. प्राची रावळ, माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, जयंत मटकर, प्रा. विलास वाघ, डॉ. नितीन केतकर, प्रा. गीतांजली वैद्य उपस्थित होते.

‘सरकारला पाठिंबा देणारे आणि त्यांच्या बाजूनेच बोलले जावे व लिहिले जावे, अशी सक्ती केली जात आहे. सरकार नामक व्यवस्थेने लोकशाही व तिच्याशी संबंधित मूल्यांची पायमल्ली केली आहे. एकीकडे सर्वात मोठी लोकशाही असलेला देश म्हणायचे आणि दुसरीकडे स्वातंत्र्याची गळचेपी करायची, हे विसंगत आहे. लोकशाहीप्रमाणेच धर्मनिरपेक्षताही धोक्यात आली आहे. भारतात सर्वकाही आलबेल आहे असे, भासवले जात आहे. प्रत्यक्षात देशातील अल्पसंख्याक दहशतीखाली आहेत. आमच्या सोबत या, अन्यथा परिणामांना सामोरे जा, असे वातावरण अनुभवण्यास मिळत आहे. बुद्धिभ्रम करण्याचे षड्‌यंत्र सुरू आहे,’ अशी घणाघाती टीका सहगल यांनी केली. डॉ. नीलिमा वैद्य यांनी सूत्रसंचालन केले. वर्षा गुप्ते यांनी आभार मानले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!