Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Loksabha 2019 : भारतीय सैन्याला “मोदी सेना ” म्हटल्याने योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात गदारोळ !!

Spread the love

लोकसभा निवडणुकीचे वातावरण देशभर तापत असून भारतीय लष्कर हे ‘मोदी यांची सेना’ आहे, असे बेताल वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी रविवारी रात्री गाझियाबाद येथे जाहीर प्रचार सभेत केले. त्यांच्या या वक्तव्यावर विरोधकांकडून टीका होत आहे. निवडणूक आयोगाने याची दखल घेऊन त्यांच्या विरुद्ध कारवाईची मागणी होते आहे.

गाझियाबादमधील विद्यमान खासदार आणि केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंग यांनाच पक्षाने उमेदवारी दिली आहे. त्यांच्या प्रचारसभेत आदित्यनाथ बोलत होते.

ते म्हणाले, काँग्रेसच्या नेत्यांनी दहशतवाद्यांना बिर्याणी खाऊ घातली तर मोदींच्या सेनेने दहशतवाद्यांना गोळी आणि गोळा (गोलाबारुद) दिला आहे. हाच त्यांच्यात आणि आमच्यात फरक आहे. मसूद अझरसारख्या अतिरेक्याच्या नावापुढे काँग्रेस नेते आदरार्थी ‘जी’ लावतात आणि दहशतवादालाच प्रोत्साहन देतात, असेही ते म्हणाले.

पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करून अतिरेकी आणि पाकिस्तानचा कणाच मोडला गेला आहे. हे काम भाजप सरकारने करून दाखवले आहे. हाच आमच्यात आणि त्यांच्यात असलेला फरक आहे, असेही आदित्यनाथ म्हणाले. काँग्रेसला जे अशक्य होते ते पंतप्रधान मोदी यांनी शक्य करून दाखवले. मोदी आहेत म्हणूनच अशक्य ते शक्य झाले आहे, असेही ते म्हणाले.

भारतीय लष्कराचा ‘मोदी की सेना’ असा उल्लेख करून मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केल्याबद्दल निवडणूक आयोगाने आदित्यनाथ यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने केली आहे. कम्युनिस्ट पक्षाचे नेते डी. राजा म्हणाले की, लष्कर हे देशाचे आहे त्याची बांधिलकी एका पक्षाशी कशी असू शकते? त्यामुळे या अपप्रचारातून आदित्यनाथ यांनी मतदारांच्या मनात संभ्रम उत्पन्न केला आहे.

भाजपवर टीका करताना राजा म्हणाले की, त्यांना आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा विसर पडला आहे आणि गेल्या पाच वर्षांत सरकारने केलेली कामेही त्यांना सांगता येईनाशी झाली आहेत. त्यामुळे संरक्षण दलांना राजकीय रंगात रंगविण्याची त्यांची धडपड सुरू आहे. निवडणूक आयोगाने त्याची गंभीर दखल घेत आदित्यनाथ यांच्यावर कारवाई केली पाहिजे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!