Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Loksabha 2019 : काँग्रेसचा ” जन आवाज ” देशविरोधी असल्याची अरुण जेटली यांची टीका

Spread the love

काँग्रेसने आज लोकसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा ‘जन आवाज’ या नावाने  प्रसिद्ध केल्यानंतर हा जाहीरनामा देशविरोधी असल्याचे लेबल लावत भाजपने काँग्रेसवर जोरदार शब्दांत निशाणा साधला आहे. केंद्रीय मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसवर तोफ डागली. काँग्रेसकडून जी आश्वासने देण्यात आली आहेत त्यातील धोके वेळीच ओळखण्याची गरज आहे. हा अजेंडा देश तोडणारा असून यात कधीही पूर्ण होऊ शकणार नाहीत, अशीही आश्वासने देण्यात आली आहेत, असे जेटली म्हणाले.

किमान उत्पन्न, रोजगार निर्मिती, शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प अशी अनेक आश्वासने काँग्रेसने जाहीरनाम्यात दिली असून या सर्वांवर जेटली यांनी आक्षेप नोंदवला.
राजद्रोहाचा गुन्हा ठरवणारे भारतीय दंड विधानातील कलम १२४ अ रद्द करण्यात येईल, असे वचन काँग्रेसने दिले आहे. त्यावर जेटली यांनी सडकून टीका केली. नेहरू, इंदिरा, राजीव आणि मनमोहन यांनी जे केले नाही ते राहुल यांची काँग्रेस करायला निघाली आहे. राजद्रोहाच्या गुन्ह्याची तरतूदच हटवण्याबाबत कुणी बोलत असेल तर ती अत्यंत गंभीर बाब असून असे घातक मनसुबे पूर्ण करण्याची संधीच जनता काँग्रेसला देणार नाही, असे जेटली म्हणाले. काँग्रेस पक्ष नक्षलवादी आणि जिहादींच्या कचाट्यात सापडला आहे, असा दावाही जेटली यांनी केला. काँग्रेसने गरिबांसाठी न्याय योजनेची घोषणा केली मात्र या योजनेसाठी पैसा कुठून येणार हे सांगितले नाही, याकडेही जेटली यांनी लक्ष वेधले.

जेटली धड वकीलही नाहीत आणि धड अर्थमंत्रीही नाहीत – जयराम रमेश

दरम्यान, जेटली यांची पत्रकार परिषद सुरू असतानाच जयराम रमेश, पी. चिदंबरम आणि रणदीप सुरजेवाला या काँग्रेसच्या तीन नेत्यांनी राजद्रोह कायद्यावरून भाजपने केलेल्या आरोपांना उत्तर दिले. राजद्रोहाचा कायदा ब्रिटीशांच्या काळातील असून या कायद्याची आता कोणतीही आवश्यकता नसल्याचे या तिन्ही नेत्यांनी सांगितले. देशविरोधी कृत्य करणाऱ्यांवर डिफेन्स ऑफ इंडिया व बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायदे लागू होतात, असेही त्यांनी पुढे नमूद केले. जेटली धड वकीलही नाहीत आणि धड अर्थमंत्रीही नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!