गिरीश महाजन म्हणतात … पवारांना कितीही जोर लावू द्या, येणार सुजय विखेच !! महाराष्ट्रात सर्वच्या सर्व जागा भाजपला :

Spread the love

देशात व राज्यात भाजपला अनुकूल वातावरण आहे. लोक भाजपच्या सोबत आहेत, त्यामुळे महाराष्ट्रात सर्वच्या सर्व जागा भाजपला मिळाल्या तरी आश्यर्च वाटायला नको, असे आत्मविश्वासाने सांगत शरद पवारांनी कितीही जोर लावला तरी नगरच्या जागेवर सुजय विखे यांचा विजय पक्का आहे, असे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी नगरमध्ये सांगितले.
सोमवारी दुपारी विखे यांचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर महाजन माध्यमांशी बोलत होते. उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी आपल्याकडे असून, येथील सर्व आठ जागा भाजप मोठ्या मताधिक्याने जिंकेल, असे सांगत महाजन यांनी कॉँग्रेस-राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडले. आघाडी म्हणून, पक्ष म्हणून एवढेच काय कुटुंब म्हणूनही विरोधकांत एकमत नाही. पुण्यासह अनेक ठिकाणी अद्याप त्यांना उमेदवारही मिळेलेले नाहीत. इतिहासात झाली नव्हती एवढी वाईट अवस्था आज विरोधकांची झाली आहे, असा टोला महाजन यांनी मारला.

गिरीश महाजन माझे पालक – सुजय विखे

सुजय विखे यांनीही विजयाचा दावा केला. अर्ज भरताना आपले आई-वडील उपस्थित नसल्याबद्दल विखे यांना पत्रकारांनी विचारले असता, भाजप हेच माझे कुटुंब आहे. मंत्री महाजन यांनी वडिलांची उणीव भासू दिली नाही, पालकमंत्री तर माझे पालकच आहेत, असे विखे म्हणाले. संघटना म्हणून भाजप पक्ष काम करतो. येथे सर्व नेते, कार्यकर्ते एकसंघ असतात, नाराजी कोणाचीही नसते, त्यामुळेच आज अर्ज भरताना खासदार दिलीप गांधी यांच्यासह भाजपचे, तसेच शिवसेना व मित्रपक्षाच्या सर्वच कार्यकर्त्यांनी हजेरी लावली, असे विखे यांनी सांगितले.

आपलं सरकार