Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

काॅपी मुक्त अभियान : जबाबदारी, शिक्षक आणि पालकांची !! उज्वल पिढी घडविण्याची…

Spread the love

✓दहावी व बारावीबोर्डाच्या परीक्षा एकूणच शिक्षण व्यवस्थेवर विचार प्रवृत्त करणारे हे शिक्षणाधिकारी डॉ बी बी चव्हाण यांचे हे पत्र आहे. एकूणच मराठवाड्यातील शिक्षण क्षेत्रातील सर्वच धुरणींनी यावर चिंतन करून कॉपी मुक्तीची चळवळ अधिक सक्षम करायला हवी.

आपल्या चिंतनासाठी हे पत्र  !!

प्रिय मुख्याध्यापक बंधू भगिनींनो,

सप्रेम नमस्कार.

नुकत्याच शालांत प्रमाणपत्र परीक्षा व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा संपन्न झाल्या आहेत. विद्यार्थी , पालक वर्ग आणि शिक्षक बांधव यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. संपूर्ण महिनाभर विविध परीक्षा केंद्रावर भेटी देत असतांना काही बाबी प्रकर्षाने मला जाणवल्या ते आपल्याशी शेअर करावे म्हणून हा पत्रप्रपंच मी आपल्याशी करत आहे. विविध परीक्षा केंद्रावर भेटी देत असताना विशेष करून शहरातील काही परीक्षा केंद्रावर आणि ग्रामीण भागातील काही परीक्षा केंद्रावर भयमुक्त आणि कॉपीमुक्त वातावरणामध्ये परीक्षा संपन्न झाल्याचा मनस्वी आनंद वाटतो. वर्षभर माझ्या शिक्षक बांधवांनी विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी अहोरात्र आणि कठोर मेहनत घेऊन परीक्षेला सामोरे गेले आणि कॉपीमुक्त वातावरणामध्ये परीक्षा दिल्या. त्यामुळे उत्कृष्टतेचा ध्यास असलेली काही मंडळी अजूनही असल्याचे पाहून समाधान वाटले. मात्र दुर्दैवाने काही परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांपेक्षा संस्थाचालक, संस्था प्रतिनिधी, मुख्याध्यापक,प्राचार्य आणि शिक्षक हेच कॉपी पुरविण्यासाठी अग्रेसर असल्याचे पाहून मन विषन्न झाले.

काही दिवसांपूर्वी वाचनात आलेला एक विचार आपल्या पुढ्यात ठेवत आहे. दक्षिण आफ्रिकेतील एका विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर विचारासाठी एक संदेश चिटकवण्यात आला होता.

एखादया देशाला नष्ट करायचे त्यासाठी अणू बॉम्ब किंवा लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे डागावी लागत नाहीत. केवळ शिक्षणाचा दर्जा खालवण्याची व्यवस्था केली आणि परीक्षेत मुलांना कॉपी करण्याची मोकळीक दिली तरी हे शक्य होते. अशा शिक्षण पद्धतीतून तयार झालेल्या डॉक्टरांच्या हातून रुग्णांचे मृत्यू होतात,अशा अभियंत्यांनी बांधलेल्या इमारती कोसळतात, अशा शिक्षण पद्धतीतून आलेले अकाउंटंट आणि अर्थशास्त्रीकडून पैशांची नासाडी होते. अशा देशामधील धार्मिक प्रवचनकाराकडून मानवतेची हत्या होते. न्यायाधीशांकडून न्याय मिळत नाही. शिक्षण व्यवस्था कोलमडून पडली की सगळे राष्ट्र कोलमडून पडते ” 

कॉपी पुरविण्यासाठी शिक्षकांचा उत्साह वाखाणण्यासारखा दिसून आला. जो पर्यंत कॉपी हा प्रकार शिक्षकांच्या डोक्यातून जाणार नाही , तो पर्यंत ,’कॉपीमुक्त परीक्षा’ हे एक स्वप्न म्हणूनच राहणार आहे. दहावीच्या गुणांवर कुठल्याही प्रकारची प्रवेश परीक्षा नाही. हे माहीत असूनही शिक्षक कॉप्या पुरविण्यात का अग्रेसर असतात ? याचे उत्तर मुळात जाऊन शोधणे गरजेचे आहे. 60 ते 65 टक्के गुणांची ऐपत असलेल्या विद्यार्थ्याला 85 ते 90 टक्के गुणांपर्यत नेऊन ठेवून कोणता पुरुषार्थ आपली मंडळी साध्य करणार आहेत ? याचे कोडे मला अजूनही उलगडत नाही. हा शुद्ध विद्यार्थ्याला व पालकाला भ्रमित करण्याचा प्रकार आहे. या परीक्षेदरम्यान आणखी प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे नवीन अभ्यासक्रम पद्धतीनुसार कृती पत्रिका असल्याने कॉपी करण्यासाठी मुळातच फार थोडी संधी आहे. कॉपी करण्यासाठी मुळातच संधी कमी असल्यामुळे आता तरी कृती पत्रिका असल्यामुळे कॉपी कमी होईल अशी अपेक्षा होती. रेडिमेड पुस्तकातून कॉपी करणे शक्य नसल्यामुळे आता परीक्षेच्या प्रत्येक दालनातून सामूहिक डिक्टेशन दिसून येते. कॉपीमुक्तीच्या दिशेने कृती पत्रिका हे एक पाऊल होते, परंतु आता कॉपी करता येत नाही म्हणून परीक्षेच्या प्रत्येक दालनातून विद्यार्थ्याला तोंडी उत्तरे सांगण्याचा प्रकारही प्रशासनाला भ्रमित करणारा आहे. मुंबई, ठाणे , कल्याण येथील विद्यार्थी आणि शहरातील विद्यार्थी ग्रामीण भागातील कुठल्यातरी दूर केंद्रावर परीक्षेसाठी प्रवेशित होतो याचे उत्तरही शोधावे लागणार आहे. शिक्षकांनी व मुख्याध्यापकांनी स्वतःचे आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे. दहावीच्या परीक्षेच्या गुणांमधून नेमका विद्यार्थी कोठे उभा आहे? त्याची कुवत काय आहे? हे जाणून घेण्यासाठी पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी मला वाटते शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे इयत्ता दहावीची परीक्षा ही एक संधी आहे. परंतु विद्यार्थ्याला तो नेमका कुठे उभा आहे याची जाणीवच मुळातून होऊ न देणे आणि फुगलेल्या मार्क्समधून पालकांसहित विद्यार्थ्याला भ्रमित करणे हा प्रकार अवसानघातकी आहे. या सगळ्याच गोष्टींची उत्तर काही मुख्याध्यापक बांधव , शिक्षक बांधव यांच्या सोबत बसून चर्चेतून सोडवावी लागणार आहे. यावर काही उपाय योजना करता येतात का? याचाही साकल्याने विचार करणार आहोत.

पुढील वर्षीच्या परीक्षा चांगल्या पद्धतीने आणि विद्यार्थ्यांचे यथायोग्य आकलन करण्यासाठी घेतल्या जाईल यासाठी आपल्या सर्वांच्या मदतीने नियोजन आणि नियोजन बरहुकूम कार्यवाही करावी लागणार आहे.

तूर्त दहावीची परीक्षा नुकत्याच संपल्या असल्यामुळे आता शाळास्तरावरील परीक्षाना सुरुवात होणार आहे.इयत्ता दहावीच्या वर्गात प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काही पूर्व तयारी आणि नियोजन आपण आत्तापासूनच करायला हरकत नाही. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित , विज्ञान आणि भाषा या विषयामध्ये पूर्वज्ञानावर आधारित 20 टक्के गुण निर्धारित करण्यात आले आहेत.इयत्ता दहावीच्या वर्गात प्रवेशित होऊ घातलेल्या विद्यार्थ्यांसाठी पूर्वज्ञानावर आधारित 20 टक्के गुणांची तयारी सर्व शाळांमधून सर्व मुख्याध्यापक आणि विषय शिक्षक यांनी करून घ्यावी .साधारणपणे दीड महिन्याच्या कालावधीमध्ये हे म्हणजेच 1मे पर्यंत सर्वच विद्यार्थ्यांना पूर्वज्ञानावर आधारित प्रश्नांच्या तयारीसाठी शाळास्तरावर मुख्याध्यापकांनी नियोजन करावे. 20% गुणांच्या तयारीसाठी गणित , विज्ञान आणि भाषा यांचे PDF सर्व शाळांना यापूर्वीच उपलब्ध करून दिलेले आहेत. ते सर्व मुख्याध्यापकांनी उपलब्ध करून घ्यावेत जणेकरून सुट्टीच्या कालावधीच्या अगोदर दहावीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची 20 टक्के तयारी ही आपोआप होईल. नियोजन जर योग्य असेल आणि नियोजन नियमबरहुकूम , जर अंमलबजावणी केली असेल तर मला वाटते कॉपी सारख्या प्रकारापासून आपल्याला निश्चितपणे दूर राहता येईल.

सर्वाना मनपूर्वक शुभेच्छा !!!

डॉ. बी.बी. चव्हाण

शिक्षणाधिकारी, जि.प. औरंगाबाद.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!