Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

आदिवासी महिलेचा विनयभंग आणि अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात तीन वर्षे कारावासाची शिक्षा

Spread the love

विधवा आदिवासी महिलेच्या घरात रात्रीच्या वेळेस घुसून तिचा विनयभंग करणाऱ्या प्रकाश सीताराम अंधेरे (४२) याला ठाणे जिल्हा सत्र व विशेष न्यायालयाचे न्यायाधीश जी.पी. शिरसाठ यांनी दोषी ठरवत, शुक्रवारी अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात तीन वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. ही घटना २००८ साली गणेशपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. या खटल्यात सरकारी वकील म्हणून रेखा हिरावळे यांनी काम पाहिजे. अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टमध्ये बदल झाल्यानंतर ठाण्यात कठोर शिक्षा होण्याची बहुधा ही पहिलीच घटना आहे.

भिवंडी तालुक्यातील दुगाड, हिवाडी येथे राहणारा आरोपी अंधेरे याने पीडित महिला आदिवासी समाजाची आहे, हे माहिती असतानासुद्धा दि. १९ आॅक्टोबर २००८ च्या मध्यरात्री तिच्या घरात शिरकाव करून, तिचा विनयभंग केला. त्यावेळी ती मुलांसोबत झोपली होती. तिने केलेल्या आरडाओरडीनंतर त्याने तेथून पळ काढला. महिला आणि तिच्या मुलाने अंधेरेला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो पळाला. गणेशपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध सबळ पुरावा संकलित करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

हा खटला विशेष न्यायालयाचे न्यायाधीश शिरसाठ यांच्यासमोर चालवला गेला. सरकारी वकील हिरावळे यांनी सादर केलेल्या पाच साक्षीदारांची साक्ष तसेच पुरावे ग्राह्य मानून न्यायालयाने अंधेरे याला दोषी ठरवले व शुक्रवारी शिक्षा ठोठावली. यामध्ये अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टनुसार तीन वर्षे कारावास व एक हजार रुपये दंड, विनयभंगप्रकरणी एक वर्ष कारावास आणि भादंवि कलम ४५२ प्रकरणी सहा महिने कारावास आणि एक हजार रुपये दंड अशा वेगवेगळ्या शिक्षांचा समावेश आहे. या गुन्ह्याचा तपास गणेशपुरी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी एच.ए. आव्हाड यांनी केला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!