Loksabha 2019 : बिघडलेल्या मुलाला सुधरवण्यासाठी निवडणुकीत उतरवले, अजीत पवार म्हणजे जनरल डायर – शिवतारे

Spread the love

बारामतीचा जनरल डायर मावळमध्ये येऊन माझ्या मुलाला मत द्या म्हणतोय. त्यामुळे तुम्ही सर्वजण सावध व्हा, मावळमधून राष्ट्रवादीला एकही मत मिळालं नाही पाहिजे, असे आवाहन राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी मावळच्या जनतेला केले. या निवडणुकीनिमित्त बिघडलेल्या पोराला सुधरवण्याचं काम होत असल्याचे म्हणत त्यांनी अजित पवारांवर निशाणा साधला. वडगाव मावळ येथे युतीचे उमेदवार आणि शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. बारणे यांच्या प्रचाराचा नारळ आज फोडण्यात आला. यावेळी राज्यमंत्री विजय शिवतारे, शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे, आमदार संजय उर्फ बाळा भेगडे आदी नेते उपस्थित होते.

शिवतारे म्हणाले, मावळ गोळीबार प्रकरणानंतर अजित पवार यांनी चर्चा करण्यासाठी शेतकऱ्यांना आणि भारतीय किसान मोर्चाच्या सदस्यांना बोलावल होतं. यावेळी मावळ बंदनळ योजनेला कितीही विरोध झाला तरी होणारच तसेच गरज पडल्यास पोलीस बळाचा वापर करण्यात येईल असे अजित पवार उर्मटपणे म्हटले होते. हा बारामतीचा जनरल डायर आज मावळमध्ये येऊन माझ्या मुलाला मत द्या, असं सांगतो आहे.

त्यामुळे तुम्ही सर्व जण सावधान व्हा, माझा प्रत्येक शब्द खरा आहे हे राजकीय भाषण नाही. मावळमधून राष्ट्रवादीला एकही मत नाही मिळालं पाहिजे, हीच मावळमधील गोळीबारातील शेतकऱ्यांना खरी श्रद्धांजली असेल असे शिवतरे यावेळी म्हणाले. १९९१ साली बारामती मतदारसंघातून आम्ही जी चूक केली ती तुम्ही करू नका. १९९१ला शरद पवार माझ्या पुतण्याला मत द्या, अस सांगत होते. आम्ही मतं दिली विश्वास ठेवला त्याचा परिणाम असा झाला की, महाराष्ट्रात भ्रष्टाचारी निवडून दिला. महाराष्ट्राचा आम्ही घात केला होता असा घात पुन्हा होऊ देऊ नका असे शिवतारे म्हणाले.

काल-परवापर्यंत मुंबई, पुणे, गोवा येथे पबमध्ये नाचणारा माणूस रथयात्रेत नाचू लागतो. काय जादू आहे या लोकशाहीची. विदेशी गाड्यात फिरणारा माणूस ट्रेनमध्ये बसायला लागतो. शेतकऱ्यांच्या बांधावर जायला लागतो. बिघडलेल्या पोराला सुधरवण्याचं चांगलं काम या निमित्ताने होत आहे. अजित पवारांची चिंता कमी होईल निवडणूक सार्थकी लागली असंच म्हणाव लागेल, अशा शब्दांत त्यांनी अजित पवारांवर टीका केली.

आपलं सरकार