Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Mission Shakti : मोदींच्या भाषणावर विरोधकांचा आक्षेप , निवडणूक आयोगाचे चौकशीचे आदेश

Spread the love

‘मिशन शक्ती’ मोहीमेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेले भाषण तपासण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. मोदींच्या भाषणातून आचारसंहितेचे उल्लंघन झाले आहे का? याची तपासणी करण्यात येणार आहे. माकपने यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार केली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनीही पंतप्रधान मोदींविरोधात तक्रार करणार असल्याचं म्हटलं आहे.

क्षेपणास्त्राद्वारे उपग्रह नष्ट करण्याच्या ‘मिशन शक्ती’ या भारताच्या यशस्वी मोहीमेची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दुपारी इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांद्वारे देशाला दिली. निवडणूक आचारसंहिता असताना मोदींनी केलेल्या या भाषणावर विरोधी पक्षांनी आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत निवडणूक आयोगाने तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत. मोदींच्या भाषणाची प्रत आयोगाने मागितली आहे. मोदींचे भाषण आयोग तपासणार आहे. या भाषणातून आचारसंहितेचे उल्लंघन झाले आहे का? याची तपासणी निवडणूक आयोगाच्या चौकशी समितीतील अधिकारी करणार आहेत. मोदींनी भाषणातून आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप माकपने केला आहे. या प्रकरणी माकपचे सरचिटणीस सीताराम येच्युरी यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहित लेखी तक्रार केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः निवडणूक लढवत आहेत. तसंच निवडणुकीच्या काळात त्यांनी भाषण केले आहे. हे आचारसंहितेचे उल्लंघन आहे, असं येच्युरी यांनी पत्रात म्हटलं आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनीही मोदींच्या भाषणावर आक्षेप नोंदवला आहे. मोदींनी आचारसंहितेचे उल्लंघन केले असून त्यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचं ममता बॅनर्जी म्हणाल्या. मोदी काय अंतराळात गेले होते?, अशी बोचरी टीकाही ‘मिशन शक्ती’च्या भाषणावरून ममता बॅनर्जींनी मोदींवर केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!