Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

गोविंद पानसरे हत्येतील संशयितांची माहिती देणाऱ्यांना ५० लाखाचे बक्षीस

Spread the love

महाराष्ट्रातील जेष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणात दोघा संशयित फरार आरोपींची खात्रीशीर माहिती देणाऱ्यास सीआयडीने बक्षीस रक्कमेत तब्बल पाचपट वाढ केली आहे. सनातन संस्थेचे साधक विनय बाबुराव पवार व सारंग दिलीप अकोळकर यांचा पानसरे हत्येत सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्याबाबत माहिती देणाऱ्यास यापूर्वी १० लाख रुपयांचे बक्षीस घोषित केले होते. परंतु आता सीआयडीने रक्कम ५० लाख रुपये केली असल्याची माहिती मंगळवारी गृह विभागाकडून जाहीर करण्यात आली आहे. यासंबधी माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार आहे.

गोविंद पानसरे यांच्यावर १६ फेब्रुवारी २०१५ रोजी अज्ञात मारेकऱ्यांनी गोळीबार केला. त्यात पानसरे यांचा २० फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला. त्यानंतर या हत्याप्रकरणाचा तपास करण्यासाठी ‘एसआयटी’ची स्थापना करुन तपास करण्यात आला. १६ सप्टेंबर २०१५ रोजी सनातन संस्थेचा साधक संशयीत समीर विष्णू गायकवाड याला अटक केली. त्याच्याविरोधात १४ डिसेंबर २०१५ रोजी न्यायालयात मुळ दोषारोपपत्र सादर केले. त्यानंतर सनातन संस्थेशी निगडीत असणाऱ्या हिंदू जनजागृती समितीचा पदाधिकारी डॉ. विरेंद्रसिंह शरदचंद्र तावडे याच्यासह सनातन संस्थेचा साधक विनय पवार व सारंग अकोळकर यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.

या गुन्ह्यातील संशयीत फरार असणारे पवार आणि अकोळकर यांना अटक करण्यासाठी विशेष पथकाकडून कसोशीने प्रयत्न करण्यात आले. या दोघांच्या अटकेसाठी सत्र न्यायालयात १३ जुलै २०१७ रोजी अजामीनपात्र वॉरंट प्राप्त करुन घेण्यात आले. त्यानंतर या दोघांबाबत माहिती देणाऱ्यास १० लाखाचे बक्षीस जाहीर करण्यात  आता पाच पट  वाढ करण्यात आली आहे .

मात्र आज अखेर दोन्हीही संशयित पोलिसांच्या हाती न लागणे, तसेच तपासात प्रगती न झाल्याने मुंबई उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती. २८ मार्च रोजी गृह विभागाचे मुख्य सचिव यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे संशयित आरोपी पवार व अकोळकर यांच्यावर जाहीर केलेल्या बक्षीसामध्ये वाढ करण्यात आली आहे. प्रत्येकी २५ लाख असे मिळून एकूण ५० लाख करण्यात आले आहे.

एसआयटी अधिकाऱ्यांच्या संख्येत वाढ
हा तपास मोठा असल्याने गृह विभागाने एसआयटी (विशेष तपास पथक) पथकातील अधिकाऱ्यांची संख्याही वाढवण्यात आली आहे. पथकामध्ये अधिकाऱ्यांची संख्या वाढवली आहे. या पूर्वी ७ अधिकारी व १५ कर्मचारी एकूण २३ लोक कार्यरत होते. आता नव्याने १ पोलीस उपाधीक्षक, २ पोलीस निरीक्षक , ३ सहाय्यक पोलीस निरीक्षक, १ पोलीस उपनिरीक्षक, १० कर्मचारी सर्व मिळून ४० जणांचे पथक हा तपास करणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!