Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

दावत कि अदावत : लोकसभेच्या निमित्ताने “पंतां”ची पंगत ,”वाघा”चा ढेकर आणि उपाशी मित्र पक्षांचे रिकामे ताट !!

Spread the love

संवाद, विसंवाद आणि शेवटी सुसंवाद….

” पंतांनी बोलावलंय “

“मोठ्या लोकांची पंगत उठून गेलीय आता, चला…”

” त्यांनी ४८ चं ताटं लावले व्हते…”

” २५ पंतांचे आणि २३ वाघवाल्यांचे “

” जेवण संपले म्हणतात…”

“मंग , आता काय पंतरवळ्या उचलायच्यात का ?”

“मंग, दुसरं काय ?”

“नाही येत म्हणून सांग …”

“साहेब , उपाशी मराल ..”

“पाटलांचं बी खळं उडून गेलंय…”

“मंग ,आता ….?”

” त्या “भंडारावाल्यांकडं” चला…”

” ते आपल्याला जवळ येऊ देत नाहीत”

” का ?”

“आपल्याला “बाटगे”म्हणतात…”

“आमचा भंडारा,पंतांच्या किंवा पाटलांच्या मेहेरबानीतून न्हाय तर आमच्या वर्गणीतून आम्ही केलाय म्हणतात…”

” आम्ही आमचे करणार आणि खाणार म्हणत्यात…”

“पंतांचा निरोप हाय !!”

“येत असाल तर या न्हाय तर गेले उडत…”

“आमच्याकडं लय चौकीदार झालेत म्हणतात, तुमची गरज न्हाय…”

” आर आरं…जोरात बोलू नको…कुणी व्हायरल करील सगळं…”

“कार्टे , सगळं सोशल मीडियावर टाकतात…”

“मंग , आता काय करायचं? म्हणता…?

” पण ,आपल्याला एक तरी ताट द्यायला पाहिजेल होतं…”

“मला , देत व्हते पण आमच्या ताटात खा म्हणत होते…”

“मंग ?”

“मी , म्हणलं नको…माझ्या स्वतःच्या ताटात देत असाल तर द्या नाही तर मी उपाशी राहील पण तुमच्या ताटात खाणार नाही”

” व्वा..व्वा…ह्याला म्हणतात…स्वाभिमान..”

“येळकोट येळकोट जय मल्हार !! “

“कुणाचा ? जयजयकार चालू आहे रे तिकडं?”

” साहेब , तुमची पार्टी दिसतेय…!!”

” पंतांच्या पंगतीतून येतेय…”

” काय ? “

“हो साहेब…!”

” थांब विचारतो…”

” काय हो ? पंतांच्या पंगतीला गेला होता कि काय ?”

“येळकोट येळकोट जय मल्हार !! “

“हा गुलाल लावा आधी…!!”

“अरे , पणकशाचा…?”

“आम्हला त्यांच्या ताटातलं दिलं पंतांनी…!! “

“येळकोट येळकोट जय मल्हार !! “

” अरे ,थांबव हे सगळं…,तू माझ्या पार्टीचा ना…”

“व्हय जी…”

” मग , मंडळीला घेऊन कशाला गेला होता पंगतीला…?”

” त्यांचा स्पेशल निरोप होता तसा…म्हणून”

” अरे , पण मी कारभारी ना तुमच्या फडाचा…”

“व्हय , पणपंतांचा निरोप म्हंजी जायला पाहिजेना…”

“मंग , मंडळीलाघेऊन…आणि त्यांच्या गळ्यात तो हार कसला?”

” तिकीट दिलंय,त्यांना…”

” कुठून ?”

“ताईसाहेबाच्या विरोधात…”

” आर , पण त्या जागेवर, मी माझा रुमाल टाकला व्हताना…”

” ते तुम्ही,पंतांना विचारा…”

“येळकोट येळकोट जय मल्हार !! “

” लावू का गुलाल…!!”

” येतो आम्ही,भावजी…”

“येळकोट येळकोट जय मल्हार !! “

” आता ? कसं करायचं?”

” तुम्हाला तर ते म्हणाले होते, आमच्या ताटात जेवा….”

“तुम्ही म्हणाले नको”

” त्यांनी बोलावलं तुमच्या फडातल्या माणसाला…”

“त्याला काय? ताट कोणतंही असो, जेवनाशी मतलब…!!”

“तसा,माणूस हुशार निघाला…”

” बरं बसता गप्प ? कि ऐकवू कविता…?”

” पंतांचा निरोप हाय…लवकर चला…”

” उद्या अंबाबाईच्या दरबारात गोंधळ हाय…”

” चला , चला….”

” व्वा …आलात ?”

“मला वाटलंच होतं येणारच म्हणून…”

” बरं ठरलं तर मग…?”

” काय ठरलं ?”

” उद्या अंबाबाईच्या दरबारात गोंधळ जागरण आहे”

” बरं , पंत..मग…”

” प्रत्येकाने आपापले वाद्य वाजवाचे आहे…”

“महा गोंधळाचा पुअर शो व्हायला नको…”

” पण आमच्या ताटांचं काय पंत ?”

” आम्ही ,जन्मा जन्माचे उपाशी आहोत…”

” काय बोलताय ?”

“दिलं नाही का आजवर तुम्हाला…?”

” हो पण आताच्या पंगतीचं काय ?”

” अरे ताटं,लिमिटेड होते…फक्त ४८”

“मग , द्यायचं आम्हाला दोघांनी एकेक ताट…”

” काय ? वेड्यासारखं करताय ?”

” बघा हेड चौकीदारांचा तुम्हाला निरोप आहे…”

” मंडळी …पुढच्या वेळी ४८८ ताटं वाढली जाणार आहेत. आणि ती आपल्या हक्कांची ताटं आहेत.”

”  प्रत्येकाला, काही ना काही तरी मिळेल…”

” काय होकवी, महाराज ? तुम्हाला आमच्या माणसाचं ताट काढून नाही का दिलं…”

” आणि तुम्ही येळकोट ? तुमचा ढोल फुटला तरी तुम्हाला नगारा दिलाच कि वाजवायला पावणे पाच वर्षे…”

“पण , समाज नाराज होतो हो साहेब…!!”

” तुम्ही नाराज आहात  का ते सांगा…?”

” पण तुम्ही, आमच्या माणसाला आणि त्यांच्या मंडळीला का ताट दिलंत ?”

” अरे ,  रिकामं ताट  दिलेय वहिनींच्या हातात . तुम्हाला तर तर घ्या म्हणालो होतो , पण तुम्ही म्हणालात तुमच्या ताटात जेवणार नाही …त्यांनी तयारी दर्शवली. म्हणून दिले. भरून आणले तर वेल अँड गुड नाही भरून आणले तर नाही आणले. तशीही तिथे शास्वती कमीच आहे…मग घेऊ परत…?बरे दिसेल का आता ?”

” बरं , ठीकाय…पण पुढे लक्ष ठेवा…”

“आता , कसे बोललात?”

” हा घ्या गुलाल…!”

“येळकोट येळकोट जय मल्हार !! “

” आणि तुम्ही राजे ? तुमचा काय प्रॉब्लेम आहे? तुम्हाला तर आम्ही कायम डोक्यावर घेतलय…राजे आहात  तुम्ही…कितीसन्मानकरतोआम्हीतुमचा…तुम्हाला आम्ही ताट द्यायचं म्हणजे खूप झालं!!”

“अहो राजे,सगळी ताटं तुमचीच !! आम्ही ती फक्त तुमच्या वतीनं सांभाळत आहोत, इतकेच…!!”

” काय पटतंय ना…?”

” हो , पण तुम्ही त्या वाघाचे मुखवटे घातलेल्याना  २३ ताटं दिलीत आणि आम्हाला राजे म्हणता आणि ताट  एकही  नाही…?”

” अहो , असे काय करताय राजे ? आम्ही निमित्त मात्र !! आमची सगळी २५ ताटं तुमचीच आहेत.आम्ही फक्त ती संभाळतोय…इतकंच !!”

” राहता , राहिला प्रश्न त्या वाघांचा…अहो त्यांनी वाघांचे मुखवटे घातले आहेत आम्हाला  काय काळत नाही का?”

” अहो पण,ते वाघांची इतकी हुबेहूब डरकाळी फोडतात कि, सगळे आमचे सगळे चौकीदार त्यांना घाबरतात…!!”

“आणि त्यांना २३ ताटांची व्यवस्था आमच्या वरिष्ठ चौकीदारांनीच केलीना…त्यात माझा काही दोष आहे का?

” म्हणून असे रुसू नका राजे !!!तुम्ही असे रुसला  तर आम्ही कुणाकडे पाहायचे?”

” ठीकाय …ठीकाय…पण पुढे लक्ष ठेवा…पंत !! “

” आणि काय हो भाऊ ? तुमच्या भैय्याने तुम्हाला वाऱ्यावर सोडले तेंव्हा आम्हीच तुमची पाठराखण केलीना ?चुकले का आमचे ?आणितुम्हीटाटासाठीरुसायचेम्हणजेखूपझालंहं…!!”

“बरे नाही वाटले आम्हाला..” “तुमच्या कडून तरी हि अपेक्षा नव्हती…”

” मग आता गेला ना रुसवा तुमचा…”

” हसा , सगळे आत…आणि जोरात म्हणा…”मै भी चौकीदार…”

” मै भी चौकीदार…!!”

” हम सब चौकीदार हैं… !! “

” हम सब चौकीदार हैं… !! “

” आता कसं ?”

” अरे , ती चौकीदारांची कापडं आणा इकडं…द्या यांना घालायला…”

” आणि आजपासून सुरु होणाऱ्या गोंधळाला…राजे तुमचा डफ, तुतारी,चौघडा,सगळं काही घेऊन या…”

” कवी महाराज, तुमच्या कविता जोरात होऊ द्या…”

” भाऊ , संबळाचा ठेका तुम्ही धरायचाय…”

” आणि खंडेराया…येळकोट जोरात,सुरत व्हायला पाहिजे…कसं…”

” चला तर मग जय महाराष्ट्र !!”

“वंदे , मातरम….”

“भारत माता कि….”

” जय !!”

……………………….

” अखेर , मित्रानो , मित्र  मित्र म्हणून ….पंतांनी लोकसभेत आपलं ताट रिकामंच ठेवलं …”

” पण , पंत लयच हुशार आहेत…!!”

” पंत  तर गेले… आपल्याला  पुढच्या विधानसभेच्या जेवणावळीच्या तटाचे गाजर दाखवून …पण , काय ? मित्रानो…? पुन्हाही पंत असेच म्हणाले तर…”

” तर त्यात काय घाबरायचं… ? नाही विधानसभेचं ताट नाही आलं तर…नगरपालिकेचे येईल, नाही तर महानगरपालिकेचे येईल नाही तर, जिल्हापरिषद – पंचायतसमितीचं येईल…जेवणावळी आता येतच राहतील…”

“खरे आहे, पुढची पाच वर्षे कुठल्या ना कुठल्या जेवणावळीचीच आहेत”

” काळजी करू नका…”

” म्हणा …येळकोट येळकोट जयमल्हार !!”

” जय भवानी, जयशिवाजी !!”

” जय भीम,जयसंविधान…”

” जय बळीराजा …”

…………………………..

>> बाबा गाडे

2 thoughts on “दावत कि अदावत : लोकसभेच्या निमित्ताने “पंतां”ची पंगत ,”वाघा”चा ढेकर आणि उपाशी मित्र पक्षांचे रिकामे ताट !!

  1. छान लिहिलंय गाडे साहेब

Comments are closed.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!