राहुल गांधीकडून ट्विटरवर पुनरुच्चार, भाजपाचे सगळे ‘चौकीदार’ चोर आहेत !!

Spread the love

द कॅरावानने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताच्या आधारे काँग्रेसने येडियुरप्पांवर १८०० कोटी रुपये भाजपाच्या केंद्रीय समितीला वाटले असा आरोप केला असून यासंदर्भात स्पष्टीकरण देण्याचीही मागणी केली आहे. त्यावरूनच “भाजपाचे सगळे चौकीदार चोर आहेत”अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा ट्विट करून केली आहे. आपल्या ट्विट मध्ये त्यांनी नमो, अरूण जेटली, राजनाथ सिंह अशी नावं लिहिली आहेत. त्यापुढे काही  रिकाम्या ओळी लिहून सगळेच चौकीदार चोर आहेत अशी टीका केली आहे.

या पूर्वीच राफेल करारात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घोटाळा केला आणि अनिल अंबानींना ३० हजार कोटींचे कंत्राट मिळवून दिले असा आरोप राहुल गांधी यांच्यासह सगळ्याच काँग्रेस नेत्यांनी केला आहे. तसंच चौकीदार चोर आहे हे वाक्यही राहुल गांधींनी त्यांच्या भाषणात वारंवार वापरत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. राफेल करारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेरबदल केले, त्याची किंमत वाढवली असेही आरोप केले आहेत. तसेच सामान्य माणसाच्या खिशातले पैसे काढून अनिल अंबानींचे खिसे भरले असाही आरोप वारंवार करण्यात आला आहे. मी देशाचा चौकीदार म्हणून काम करणार आहे पंतप्रधान म्हणून नाही अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या भाषणांमधून वारंवार केली. ज्याचाच आधार घेत काँग्रेसने चौकीदार चोर है ही मोहीम राबवली.

काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्या या मोहिमेला गांभीर्याने उत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर “मै भी चौकीदार” अशी मोहीमच  सुरु केली आहे . त्यानंतर त्यांना सगळ्याच भाजपा नेत्यांनीही  फॉलो करत आपल्या नावापुढे “मै भी चौकीदार” हे शब्द लावून ट्विटरवर नावं बदलली. आता याच गोष्टींचा आधार घेत भाजपाचे सगळे चौकीदार चोर असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली आहे. या टीकेला आता भाजपाकडून काय उत्तर दिले जाणार ? हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.

आपलं सरकार