मंगेश बनसोड यांना डावलून योगेश सोमण यांची वर्णी : मुंबई विद्यापीठ संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात

Advertisements
Spread the love

मुंबई विद्यापीठाच्या अकेडमी ऑफ थिएटर आर्टस्च्या संचालकपदी डॉ.मंगेश बनसोड यांना डावलून विद्यापीठाने योगेश सोमण, पुणे यांची नियुक्ती  केली असून डॉ. मंगेश बनसोड हे केवळ अनुसूचित जातीचे असल्याने विद्यापीठाने त्यांच्यावर अन्याय केला असल्याचे मत  मुंबई विद्यापीठ प्राध्यापक संघटना ‘उमासा’ यांनी व्यक्त केले आहे . संघटना डॉ. मंगेश बनसोड यांच्या बाजूने उभी असून या नेमणुकीविरोधात आंदोलनाच्यापवित्र्यात आहे.

डॉ.मंगेश बनसोड, अकेडमी ऑफ थिएटर आर्टस्, मुंबई विद्यापीठ या विभागात सध्या प्रभारी संचालक म्हणून गेल्या साडेतीन वर्षांपासून कार्यरत होते व ते साडे तेरा वर्षांपासून त्याच विभागात वरिष्ठ सहाय्यक प्राध्यापक पदावर आहेत, व चार वर्षे संशोधनाचा मिळून असा त्यांचा एकूण 17 वर्षांचा अनुभव आहे.
दि.12 मार्च 2019 ला मुंबई विद्यापीठात संचालक पदाच्या मुलाखती होत्या, डॉ.मंगेश बनसोड या पदाकरता पात्र उमेदवार असतांनाही स्क्रुटीनी कमेटीमार्फत त्यांना या मुलाखतीसाठी डावलून, त्यांना विद्यापीठाने प्रत्यक्ष मुलाखतीस बोलाविले नव्हते. त्यानंतर डॉ.मंगेश बनसोड यांनी राज्य मागासवर्गीय आयोगाकडे धाव घेतली. मागासवर्गीय आयोगाने त्यांचे पूर्ण म्हणणे ऐकून घेतले, व आयोगाच्या लक्षात हे आले की, या प्रत्यक्ष मुलाखतीसाठी डॉ.मंगेश बनसोड पात्र असतांना त्यांना नैसर्गिक न्यायापासून वंचित ठेवण्यात आले आहे, तेव्हा आयोगाने ताबडतोब मुंबई विद्यापीठ प्रशासनास आदेश पाठवून डॉ.मंगेश बनसोड यांना प्रत्यक्ष मुलाखतीस बोलविण्यास सांगितले. त्यानंतर विद्यापीठाने डॉ.मंगेश बनसोड यांना मुलाखतीस बोलाविले. त्यानंतर डॉ, मंगेश बनसोड यांची मुलाखत घेतली.
डॉ.मंगेश बनसोड सद्या ह्याच विभागात संचालक पदासाठी पूर्ण अर्हताधारक उमेदवार असतानाही आज दि.16 मार्च 2019 रोजी सायंकाळी 6.30 वाजता मुंबई विद्यापीठाने पुरेशी अर्हता नसणार्या बाहेरच्या उमेदवाराची (योगेश सोमण, पुणे) संचालक, अकँडेमी ऑफ थिएटर आर्टस्, या पदावर नेमणूक केलेेली आहे.