लोकसभा २०१९ : सांगलीत काॅंग्रेस कार्यकर्त्यांचा राडा !! स्वाभिमानाला जागा सोडण्यास तीव्र विरोध

Spread the love

सांगली लोकसभेची जागा काँग्रेसने स्वाभिमानी पक्षाला सोडण्याचे संकेत दिल्यानंतर सांगलीतील संतप्त कार्यकर्त्यांनी काँग्रेस समितीसमोर जोरदार शक्तिप्रदर्शन केले. पक्षाने सांगलीची जागा स्वाभिमानीला सोडली तर पक्ष कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिला आहे. दरम्यान काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, परंतु कार्यकर्ते ऐकण्याच्या बिलकुल ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते . पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जून खर्गे यांना साकडे घालत सांगलीची जागा अन्य कोणालाही देऊ नये, अशी गळ त्यांनी खर्गेंना घातली आहे. यावर पक्षश्रेष्ठी कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून सांगलीची जागा ही काँग्रेस पक्षाकडे आहे. परंतु या निवडणुकीत सांगलीची जागा ही अन्य पक्षाला देण्याची तयारी काँग्रेस पक्षश्रेष्टींकडून सुरू असल्याने कार्यकर्ते कमालीचे अस्वस्थ झाले आहेत . या कार्यकर्त्यांनी पक्षाचा निषेध करीत काँग्रेस नगरसेवक, पदाधिकारी कार्यकर्त्यांनी काँग्रेस कमिटीसमोर जोरदार घोषणाबाजी केली. सांगलीच्या जागेवर कॉंग्रेसचाच अधिकार असल्याचा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला. हाय कमांडने आपला निर्णय बदलावा, अशी मागणीही  यावेळी करण्यात आली.

कदम -पाटील यांच्यात राजकीय संघर्ष

जे नेते सांगली लोकसभेच्या उमेदवारीसाठी इच्छुक होते ते आता कुठे आहेत? ते पळवाटा का काढत आहेत? असा सवाल करत काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनी काँग्रेसचे माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि इच्छुक उमेदवार प्रतीक पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. हिंमत असेल तर प्रतीक पाटलांनी निवडणूक लढवावी, असे आव्हान देत स्वतःच्या भावाने त्यांना निष्क्रिय ठरवले आहे, असा टोलाही विश्ववजीत कदमांनी लगावला आहे. कदम आज सांगलीत पत्रकार परिषदेत बोलत होते.

सांगली लोकसभेच्या जागेवरून गेल्या महिन्यापासून सांगली काँग्रेसमध्ये सुप्तसंघर्ष सुरू आहे. वसंतदादा पाटील घराणे विरोधात पतंगराव कदम घराण्यातला हा संघर्ष आज उफाळून आला. काँग्रेस आमदार व माजी मंत्री पतंगराव कदम यांचे पुत्र विश्वजित कदम यांनी वसंतदादा घराण्यातील माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील आणि विशाल पाटील यांच्यावर सांगली लोकसभा उमेदवारी नाकारल्यावरुन निशाणा साधला आहे.  दरम्यान, सांगली लोकसभेची जागा स्वाभिमानीला द्यायची की नाही यावर अद्याप निर्णय झालेला नाही. परंतु खासदार राजू शेट्टींसोबत आघाडी करून ही निवडणूक लढणार असल्याचेही कदम यांनी स्पष्ट केले आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *