भाजपाला आपला छुपा नव्हे तर उघड पाठिंबा , मोदीच पुन्हा पंतप्रधान : रामदास आठवले

Advertisements
Spread the love

‘सगळ्यांना विश्वासात घेऊन मी मागील लोकसभा निवडणुकीत शिवसेना, भाजपसोबत गेलो. यावेळीही छुपा नाही तर उघडपणे त्यांना थेट पाठिंबा देणार आणि काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीचे बारा वाजवणार,’ असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सोमवारी केले. ‘डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या सभेला गर्दी होत असली तरी पुन्हा मीच सत्तेत असेन,’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे आयोजित संकल्प परिषदेत दसरा चौकात बोलत होते. जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे अध्यक्षस्थानी होते.

आठवले म्हणाले, ‘शिवसेना, भाजपने मुंबईतील जागा माझ्यासाठी सोडावी, अशी अपेक्षा आहे. काहीही झाले तरी नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान झाले पाहिजेत. पाच वर्षांत मोदी यांनी चांगले काम केले आहे. दहा टक्के सवर्ण आरक्षण, मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण दिले. ओबीसी, भटक्या विमुक्त, धनगर समाजाच्याही मागण्या पूर्ण झाल्या आहेत. यामुळे माझा पक्ष भाजप, शिवसेनेसोबत असेल. तेही माझ्यासोबत असतील. सत्तेपर्यंत पोहचण्यासाठीच्या माझ्या निर्णयावर काहीजण ‘कुत्रं’, ‘मांजर’ अशा शब्दांत टीका करीत आहेत. मात्र आम्ही पिसाळलो की चावतो, हेही टीका करण्याऱ्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. भीमा कोरगावनंतरच्या महाराष्ट्र बंदमध्ये माझ्या पक्षाचे कार्यकर्ते आघाडीवर होते. मात्र त्याचे श्रेय प्रकाश आंबेडकर घेत आहेत. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत.’

यावेळी महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष राजा सरोदे, उत्तम कांबळे, मंगलराव माळगे, अॅड. पंडितराव सडोलीकर, परशुराम वाडेकर, प्रा. शहाजी कांबळे यांची भाषणे झाली. बी. के. कांबळे यांनी प्रास्ताविक केले. रूपा वायदंडे यांनी सूत्रसंचालन केले. चंद्रकांत वाघमारे, जितेंद्र बनसोडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. आठवले यांनी कवितेतून कार्यकर्त्यांना आवाहन केले. ते म्हणाले, ‘माझ्या भीमाला आपण मानायचं हाय, मोदी सरकार पुन्हा देशात आणायच हाय, काँग्रेसला आता आणायचं नाय, राष्ट्रवादीला आता मानायच नाय, समतेचा संकल्प करायचा हाय, जागी झाली आता माझी माय, संघर्षाची दुधाची आता झाली साय , नरेंद्र मोदी यांना सध्यातरी सोडणार नाय.’ अशी कविता केली.