Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ख्वाजाचे दमदार शतक; भारतापुढे २७३ धावांचे आव्हान

Spread the love

उस्मान ख्वाजा ( १००) आणि पीटर हँड्सकोम्ब ( ५२) यांच्या फटकेबाजीनंतर अन्य फलंदाजांनी पत्करलेल्या हाराकिरीमुळे ऑस्ट्रेलियाला ८ बाद २७२ धावाच करता आल्या. पाचव्या वन डे सामन्यात विजय मिळवून मालिका खिशात घालण्यासाठी भारतासमोर २७३ धावांचे लक्ष्य आहे. भारताच्या जसप्रीत बुमराने सर्वात प्रभावी गोलंदाजी करताना ऑसींच्या धावगतीला पायबंद केला . पण, त्याच्या अखेरच्या दोन षटकांत ऑस्ट्रेलियाने ती कसर भरून काढली. भुवनेश्वर कुमारने तीन, तर रवींद्र जडेजा व मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. कुलदीप यादवची  (७४) कामगिरी  मात्र लक्षणीय राहिली.

ऑस्ट्रेलियाच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ४३ चेंडूत २७ धावा करणाऱ्या कर्णधार फिंचला लवकर माघारी परतावे लागले. रवींद्र जाडेजाने त्याला त्रिफळाचित केले. त्याने खेळीत ४ चौकार लगावले. ख्वाजाने शतक ठोकले. पण १० चौकार आणि २ षटकार फटकावून आपले मालिकेतील दुसरे शतक झळकावणारा उस्मान ख्वाजा लगेचच बाद झाला. त्याने १०० धावा केल्या. मालिकेत त्याच्या सर्वात जास्त म्हणजेच एकूण ३८३ धावा आहेत. ख्वाजापाठोपाठ स्फोटक खेळीसाठी प्रसिद्ध असलेला ग्लेन मॅक्सवेल आजच्या सामन्यात लवकर बाद झाला. त्याने केवळ १ धाव काढली. त्यानंतर जाडेजाने त्याला झेलबाद केले. गेल्या सामन्यात शतक झळकावलेल्या पीटर हॅंड्सकॉम्बने लय कायम ठेवत संयमी अर्धशतक केले. त्याने ५५ चेंडूत ५० धावा केल्या. या खेळीत त्याने ४ चौकार खेचले.अर्धशतक ठोकल्यावर लगेच तो बाद झाला आणि ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का बसला. त्याने ६० चेंडूत ५२ धावा केल्या. गेल्या सामन्यात धमाकेदार ८४ धावांची नाबाद खेळी करणारा धोकादायक ऍस्टन टर्नर झेलबाद झाला. या बरोबरच ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ तंबूत परतला. त्याने २० धावा केल्या. स्टॉयनिस (२०), कॅरी (३), कमिन्स (१५) हे फलंदाजदेखील झटपट बाद झाले. पण तळाच्या फळातील झाय रिचर्डसन याने २१ चेंडूत २९ धावा करून ऑस्ट्रेलियाला २७२ धावांपर्यंत मजल मारून दिली.

मालिकेतील पहिले २ सामने भारताने जिंकले आहेत, तर दुसरे २ सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले आहेत. त्यामुळे आज होणाऱ्या अंतिम सामन्यात विजयी होणारा संघ मालिका जिंकणार आहे. २-२ अशी मालिका बरोबरीत असताना हा सामना जिंकणे मालिका विजयाच्या दृष्टीने महत्वाचे आहे.  आजचा सामना हा दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर सुरू आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान या मैदानावर चार एकदिवसीय सामने खेळले गेले असून त्यापैकी तीन सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. तसेच या मैदानावर भारताने खेळलेल्या १९ पैकी १२ एकदिवसीय सामनेही भारताने जिंकले आहेत. World Cup 2019 आधीचा हा भारताचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना आहे

आपलं सरकार

Click to listen highlighted text!