Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

राज ठाकरे बारामतीचा पोपट , त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका , ४५ जागा जिंकू : मुख्यमंत्री

Spread the love

सुपारीबाज  राज ठाकरेंच्या भाषणाची स्क्रिप्ट हल्ली बारामतीतून येते. ते भाषणाची सुपारी घेतात, त्यांच्या भाषणाने विचलित होऊ नका, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना लगावला. बारामतीला पोपटाची कमी पडली की ते नवा पोपट शोधून काढतात,  लोक राज ठाकरेंना ऐकतही नाहीत आणि त्यांना मत ही देत नाहीत, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सूर्यासारखे  आहेत. त्यांच्याकडे पाहून थुंकल्यास ते आपल्यावरच पडतं, अशी टीकाही त्यांनी केली.  जे बारामतीवाल्यांना बोलता येत नाही ते दुसऱ्यांच्या तोंडून बोलवून घेतात असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी राज यांच्याबरोबरच शरद पवार यांच्यावरही शरसंधान साधलं आहे. त्यांना एक आमदार निवडून आणता येत नाही, खासदार निवडून आणता येत नाही, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी राज यांची खिल्ली उडवली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस हे मुंबई येथे भाजपाच्या महिला मेळाव्यात बोलत होते. राज ठाकरे यांनी शनिवारी मनसेच्या १३ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला होता. त्यांच्या या टीकेला फडणवीस यांनी आज प्रत्युत्तर दिले. यावेळी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज याही उपस्थित होत्या.

राज ठाकरे हे फक्त कलाकार आहेत. ते १२ वा खेळाडू ही नाहीत आणि नॉन प्लेयिंग कॅप्टनही नाहीत. त्यांना एक खासदार, आमदार, नगरसेवक ही निवडून आणता येत नाही. त्यामुळे त्यांच्या भाषणाकडे लक्ष देऊ नका, असा सल्ला त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांना दिला.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात भारत सुरक्षित आहे. भारतावरील हल्ल्यानंतर त्यांनी सडेतोड उत्तर दिले. भारत बदलतोय, महाराष्ट्र बदलतोय, असे सांगत लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा सज्ज असल्याचे त्यांनी म्हटले. ५० वर्षांत जे घडले नाही ते मागील ५ वर्षांत घडले. यावेळी महाराष्ट्रात भाजपा-शिवसेना युती ४५ जागा घेतल्याशिवाय राहणार नाही, असा दावाही फडणवीस यांनी केला.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!