Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

आठवलेंना नव्हे , दक्षिण मध्य मुंबईची उमेदवारी पुन्हा राहुल शेवाळे यांनाच : उद्धव ठाकरे यांचे संकेत

Spread the love

दक्षिण मध्य मुंबईची पुन्हा उमेदवारी राहुल शेवाळे यांनाच देण्यासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुतोवाच केले आहे.  आज मातोश्रीवर शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांचा डिजीटल कार्यअहवाल उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांनी शेवाळे यांनाच दक्षिण मध्य मुंबईची उमेदवारी देण्याबाबत संकेत दिले.
आंतरारष्ट्रीय मानांकन असलेलं ISO प्रमाणपत्र मिळवलेलं देशातील पहिल्या खासदार जनसंपर्क कार्यालयाचा मानही राहुल शेवाळे यांना मिळाला आहे. याचं उद्घाटन आज ठाकरे यांच्या हस्ते मातोश्रीवरून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आलं. यावेळी दक्षिण-मध्य लोकसभा मतदार संघातील सहा विधानसभा क्षेत्रातील मतदार आणि शिवसैनिकांशी यावेळी उद्धव ठाकरेंनी ई-संवाद साधला. तसेच दक्षिण मध्य मुंबईची पुन्हा उमेदवारी राहुल शेवाळे यांना देण्याबाबतही सुतोवाच केले. सोबतच लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज असल्याचंही ठाकरे यांनी आज सांगितलं. दक्षिण मध्य मुंबई केंद्रीय मंत्री  रामदास आठवले हे इच्छुक आहेत. ठाकरे यांच्या या घोषणेमुळे आठवलेंच्या अडचणीत वाढ झाली आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाला दोन जागा हव्या आहेत. आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबत मागणी केली आहे. दक्षिण मुंबईची जागा हातून निसटल्यानंतर आठवले यांनी मुख्यमंत्र्यांकडे ईशान्य मुंबई मतदार संघाची मागणी केली आहे.
आठवले याबाबत म्हणाले की, “मी याआधी दक्षिण मुंबईतून निवडणूक लढलो होतो, त्यामुळे माझा आग्रह होता की, मला पुन्हा एकदा याच मतदार संघातून निवडणूक लढू द्यावी. परंतु आता मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ईशान्य मुंबईची जागा मागितली आहे. मुख्यमंत्र्यांनी मला शब्द दिला आहे, की तुम्हाला न्याय देऊ.”
आठवले यांनी मुख्यमंत्र्यांकडे लोकसभेच्या किमान दोन जागा मिळाव्या अशी मागणी केली आहे. आठवले म्हणाले की, “आमच्या पक्षाला शिवसेना आणि भाजपने दोन जागा द्याव्या. केंद्रात आणि राज्यात दोन मंत्रीपदं द्यावीत. शिवसेना आणि भाजपने लक्षात घ्यायला हवं की युतीमधले घटकपक्ष हे केवळ त्याग करण्यासाठी नाहीत.”

आपलं सरकार

Click to listen highlighted text!