Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्र सायबरच्या अँटी फिशिंग संकेतस्थळाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण

Spread the love

 फसवे ई मेल,एसएमएस, मोबाईल ओटीपी आदींद्वारे होणाऱ्या आर्थिक क्षेत्रातील फसवणुकीला आळा घालण्यासाठी व त्यासंबंधीची माहिती देण्यासाठी ऑनलाईन व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या महाराष्ट्र सायबरच्याwww.reportphishing.in या संकेतस्थळाचे अनावरण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज सह्याद्री अतिथीगृहात झाले. या संकेतस्थळाद्वारे ऑनलाईन फसवणूक, फिशिंगची माहिती सायबर पोलिसांना देता येणार आहे.

महाराष्ट्र सायबरचे प्रमुख विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह,पोलीस अधीक्षक बाळसिंग राजपूत,पोलीस अधीक्षक सचिन पांडकर,नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडियाचे भरत पांचाल, आशिष शहा, ॲक्सिस बँकेचे शैलेश वर्मा,एचडीएफसी बँकेचे मनिष अग्रवाल,सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद जोशी, पोलीस उपनिरीक्षक नितीन रणदिवे, मुख्यमंत्री फेलोशिपचे गणेश गिते, कार्तिक साबू आदी यावेळी उपस्थित होते.

सध्या देशात मोठ्या प्रमाणात ऑनलाईन आर्थिक व्यवहार वाढले आहेत. त्याच प्रमाणे एसएमएस,मोबाईल ओटीपी, बनावट संकेतस्थळ, फोनवरून माहिती घेऊन ग्राहकांची विशेषतः महिला,ज्येष्ठ नागरिक, अशिक्षित नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्याचे प्रमाणही वाढीस लागले आहे. अशा फसवणुकीला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सायबरचे अँटी फिशिंग युनिट कार्यरत आहे. फिशिंग करणाऱ्या विविध साधनांची माहिती नागरिकांना व्हावी,त्यापासून कशा प्रकारे सावध व्हावे,यासंबंधी जनजागृती व्हावी तसेच अशा प्रकारचे गुन्हे घडल्यास त्याची माहिती एकाच ठिकाणी मिळावी,यासाठी देशात पहिल्यांदाच महाराष्ट्र सायबरच्यावतीने हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. महाराष्ट्र सायबरने नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या तांत्रिक सहकार्याने हे संकेतस्थळ निर्माण केले आहे.

 

वाढत्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सायबरची तसेच राज्यातील सर्व जिल्ह्यात सायबर लॅब सुरू करण्याचे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य आहे. त्याचप्रमाणे आर्थिक क्षेत्रातील फिशिंगविरुद्ध माहिती देणारे व त्याला आळा घालण्यासाठी अँटी फिशिंग संकेतस्थळ सुरू करणारेही महाराष्ट्र हे पहिलेच राज्य ठरले आहे. याचबरोबर महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प, ॲटोमेटेड मल्टिमॉडेल बायोमेट्रिक आयडेटिफिकेशन सिस्टीम, अँटी पायरसी प्रकल्प इत्यादी प्रकल्प महाराष्ट्र सायबरच्यावतीने राबविण्यात येत आहेत.

सायबर गुन्हे व फिशिंग संबंधीची माहितीwww.reportphishing.in या संकेतस्थळावर नागरिकांना देता येणार आहे. आर्थिक फसवणुकीची माहिती एकाच ठिकाणी मिळावी यासाठी संपूर्ण यंत्रणा असणारे हे पहिलेच संकेतस्थळ आहे. तसेच फिशिंगच्या गुन्ह्यांची आकडेवारी या संकेतस्थळावर उपलब्ध होणार असून अशा फसवणुकीविषयी माहिती देण्यासाठी चोवीस तास उपलब्ध असणारी हेल्पलाईन,ट्विटर व ई मेल आयडीही नागरिकांच्या सेवेला असणार आहे.

विभिन्न इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपन्या, टेलिफोन कंपन्या, बँका,आंतरराष्ट्रीय संस्था आदींशी समन्वय साधून आर्थिक गुन्ह्यांचे निराकरण करण्यासाठी मदत घेतली जाणार आहे. फिशिंग विरुद्ध भक्कम यंत्रणा व नियम तयार करण्यासाठी या क्षेत्रातील सुरक्षा संस्था व तज्ञ, उद्योग विश्व, संघटना,आर्थिक संस्था यांचे सहाय्य घेतले जाणार आहे. तसेच संस्थागत जनजागृतीही करण्यात येणार आहे,अशी माहिती महाराष्ट्र सायबरच विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. सिंह यांनी यावेळी दिली.

नागरिकांमध्ये व विशेषतः ज्येष्ठ नागरिक, ग्रामीण भाग आदी फसवणूक होऊ शकणाऱ्या भागात फिशिंग आणि इतर वित्तीय फसवणुकीविरूद्ध जागरूकता निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. तसेच अशा फिशिंग साईटची अथवा कार्यपद्धतीची माहिती मिळाल्यानंतर त्यासंबंधी बँका,आर्थिक संस्था, टेलिकॉम कंपन्या यांच्यासह विविध इंटरनेट सेवा पुरविणाऱ्या संस्थांनाही दक्ष राहण्याच्या सूचना या संकेतस्थळाद्वारे देण्यात येणार आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

फसवे संकेतस्थळ, फसवे एसएमएस, सोशल मीडियावरील खोट्या पोस्ट व इतर फिशिंग गुन्ह्यांची माहिती या संकेतस्थळावर देता येणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!