Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पंकज मुंडे यांच्या महिला व बालकल्याण आणि ग्रामविकास खात्यात ६५ कोटींचा घोटाळा : धनंजय मुंडे

Spread the love

महिला व बालकल्याण आणि ग्रामविकास मंत्री पंकज मुंडे यांच्याकडील खात्यात मोबाईल खरेदीमध्ये ६५ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाने ३० जिल्ह्यांमधील ८५ हजार ४५२ अंगणवाडी केंद्रामध्ये रियल- टाइम मॉनिटरींगसाठी मोबाईल खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी बेंगळुरुतील एम एस सिस्टेक आयटी सोल्युशन प्रा.लि.या कंपनीकडून पॅनासोनिक इलुगा १७ हा मोबाईल फोन खरेदी करण्यात येणार असून या मोबाईलची किंमत बाजारात ६, ९९९ रुपये असताना पंकजा मुंडे यांच्या खात्याने या मोबाईलसाठी तब्बल ८ हजार ७७७ रुपये मोजल्याचा दावा त्यांनी केला. पॅनासोनिक इलुगा I7 या मोबाईल फोनची ऑनलाइन किंमत तपासली असता साडे सहा ते आठ हजारांमध्ये हा फोन उपलब्ध असल्याचे दिसते.

धनंजय मुंडे यांनी गुरुवारी मुंबईत पत्रकार परिषदेत मोबाईल खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. ‘वर्षभरापूर्वी देखील मोबाईल खरेदीचा प्रयत्न झाला होता. त्यावेळी याच स्पेसिफिकेशनचे १ लाख २० हजार ३३५  मोबाईल ४६ कोटी रुपयांना खरेदी केले जाणार होते. मात्र आम्ही संशय व्यक्त केल्यावर वर्षभर ही प्रक्रिया मंदावली होती. आता निवडणुकीच्या तोंडावर या खरेदीला मंजुरी देण्यात आली असून ३० ते ४० कोटी रुपयांमध्ये येणाऱ्या मोबाईल फोनसाठी तब्बल १०६ कोटी रुपये मोजण्यात आले. हा घोटाळा असून यातून नेमका कोणाला लाभ झाला, याची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.

सगळ्यात महत्वाचे म्हणजे एवढी ऑर्डर एखादया कंपनीला दिली तर सूट ही नक्कीच मिळते पण इकडे सूट तर सोडाच स्वस्त मोबाईल महागात घेतलाय आणि ज्या मोबाईलला लोकांनी मार्केटमध्ये नाकारले त्यासाठी एवढा खर्च केला यामध्येच काहीतरी गौडबंगाल असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला. एवढ्या मोठ्या प्रमाणात मोबाईल घेताना ना सरकारने आणि ना संबंधित विभागाच्या मंत्र्याने संबंधित कंपनीच्या मोबाईलची पाहणी देखील केली नाही, असे धनंजय मुंडे यांनी सांगितले.

पुरवठादार कंपनीने या मोबाईलची किंमत आठ हजार आठशे सत्त्याहत्तर पेक्षा कमी करणार नसल्याचे कळविल्यानंतरही याच पुरवठा दाराकडून खरेदी का केली, याच किंमतीत यापेक्षा चांगल्या स्पेसिफिकेशनचे आधुनिक तंत्रज्ञानाचे मोबाईल बाजारात उपलब्ध असतांना बाजारात उपलब्ध न होणारी आणि बंद पडलेल्या कंपनीचे मोबाईल का खरेदी केले असा सवाल धनंजय मुंडे यांनी केला आहे. हा मोबाईल सध्या बाजारात कुठेही उपलब्ध नाही. त्याचे उत्पादन कंपनीने चार महिन्यापुर्वीच बंद केलेले असतांना कंपनीचा जुना माल विक्री करण्यासाठी विशिष्ट पुरवठादाराला मदत करण्यासाठीच सरकारचे १०६ कोटी रुपये उधळले असल्याचा गंभीर आरोप धनंजय मुंडे यांनी केला.ज्या कंपनीला हे १०६ कोटी रुपये किंमतीचे मोबाईल पुरवठा करण्याचे काम देण्यात आले आहे त्या कंपनीची अधिकृत शेअर कॅपीटल फक्त ५ कोटी ५० लाख आणि पेड अप कॅपीटल केवळ ४ कोटी ९२ लाख ६५ हजार इतके असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. यापुर्वी देखील विभागाने मोबाईल खरेदी करीत असतांना अनाकलनीयरित्या अमेरिकेत उत्पादीत होणाऱ्या उत्पादनालाच निविदा प्रक्रियेत सहभागी होण्याची अट टाकल्याचे आपण मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देऊनही पुन्हा अशाच प्रकारे खरेदी होत असल्याचे मुंडे यांनी म्हटले आहे. या मोबाईल खरेदीच्या निर्णयात तातडीने स्थगिती देऊन या घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!