Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मैत्रीपूर्ण का होईना पण मी लढत देणारच : अर्जुन खोतकर आपल्या भूमिकेवर ठाम !!

Spread the love

“लोकसभा निवडणूक लढवायची की नाही याचा अंतिम निर्णय मातोश्रीवर होईल. मुख्यमंत्र्यांचे निमंत्रण घेऊन देशमुख आले होते. त्यांना सगळं काही सांगितलंय. मी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली नाही. राज्यात अशा अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती यापूर्वी झालेल्या आहेत, तशीच जालन्यात होईल. मी तयार आहे,  अर्थात, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल” अशी भूमिका शिवसेनेचे आमदार राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी घेतली असल्याने महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यातील वादावर तोडगा काढण्याचा पालकमंत्री सुभाष देशमुख यांचा प्रयत्न निष्फळ ठरला आहे.

खोतकर -दानवे यांच्यातील वाद मिटवण्यासाठी बंद दाराआड झालेल्या चर्चेत कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही. आजच्या चर्चेनंतरही दानवे यांच्या विरोधात लोकसभा लढण्यावर खोतकर ठाम असल्यानं गुंता वाढला आहे. दानवे यांच्या विरोधात जालन्यातून लोकसभेची निवडणूक लढविण्याची खूणगाठ अर्जुन खोतकर यांनी बांधली आहे . शिवसेना-भाजप युती झाल्यानंतर ते माघार घेतील अशी चर्चा होती. मात्र, खोतकर यांनी माघार घेण्यास नकार दिला. त्यामुळं भाजपच्या गोटात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. हा वाद मिटावा यासाठी भाजपकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठीच सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी आज खोतकर यांच्या जालन्यातील घरी जाऊन त्यांची भेट घेतली. रावसाहेब दानवे हे देखील त्यांच्या सोबत होते. तिन्ही नेत्यांमध्ये तब्बल दीड तास चर्चा झाली. मात्र, त्यातून ठोस काही पुढं आलं नाही. देशमुख यांनी हा मात्र सगळं काही व्यवस्थित होईल, असा विश्वास बोलून दाखवला. ‘खोतकर यांच्या नसानसांत शिवसेना भिनलेली आहे. ते कधीच काँग्रेसमध्ये जाणार नाहीत. आपल्याला पक्षाचं काम करताना मतभेद होत असतात. आता युती झाली आहे. त्यामुळं लवकरच दानवे व खोतकर जालन्यात युतीचं काम सुरू करतील, असं ते म्हणाले. खोतकर यांनी मात्र आपण लोकसभेच्या मैदानातून अद्याप माघार घेतली नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळं पेच वाढला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!