धनगर समाजाला आदिवासींच्या सर्व सवलती लागू : मुख्यमंत्री

Advertisements
Spread the love

सरकारचा मोठा निर्णय, धनगर समाजाला आदिवासींच्या सर्व सवलती लागू

मुंबई : धनगर समाजाला आदिवासी समाजाच्या सवलती लागू करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर घेतला आहे. आदिवासी आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत या समाजाला आदिवासींच्या सर्व सुविधा मिळतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. अनुसूचित जमातींमध्ये धनगरांचा समावेश करावा, अशी धनगर समाजाची प्रमुख मागणी आहे. त्यादृष्टीने उच्चस्तरीय उपसमितीने हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील धनगर समाजाची एकच मागणी आहे. ते म्हणजे धनगर’र’ चे धनग’ड’ झालं आहे. धनगर समाजाच्या विविध मागण्या, समस्यांसह टीस अहवालाबाबत निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारने मंत्रीमंडळ उपसमितीची नियुक्ती केली होती. या उपसमितीची शनिवारी मंत्रालयात बैठक झाली. बैठकीनंतर बोलताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या उपसमितीचे प्रमुख आहेत. ही उपसमिती धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे (एसटी) आरक्षण कशा प्रकारे देता येईल यावर निर्णय घेणार आहे. या उपसमितीत मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह चंद्रकांत पाटील, सुभाष देसाई, राम शिंदे, महादेव जानकर, पंकजा मुंडे, विष्णू सावरा, एकनाथ शिंदे, राजकुमार बडोले, संभाजी पाटील निलंगेकर यांचा समावेश आहे.