Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

दहशतवादा विरोधात चीन आणि रशियाचा भारताला पाठिंबा : सुषमा स्वराज

Spread the love

पुलवामा हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानला एकटे पाडण्यात बुधवारी भारताला महत्त्वाची आघाडी मिळाली. दहशतवादाची उगमस्थळांचे निर्मूलन करण्यासाठी सहकार्य वाढवण्यावर चीन आणि रशियाने बुधवारी सहमती दर्शवली. भारत, रशिया आणि चीन यांच्या परराष्ट्रमंत्र्यांची बैठक चीनमधील वुझेन येथे बुधवारी झाली. या वेळी दहशतवादाविरोधात सहकार्य वाढवण्यावर या देशांनी एकमत व्यक्त केले. ‘सर्व प्रकारच्या दहशतवादाविरोधात लढण्यावर आमचे एकमत झाले आहे. विशेषत: दहशतवाद आणि मूलतत्त्ववादाची उगमस्थळे नष्ट करण्यावर सहमती झाली आहे,’ असे चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी या बैठकीनंतर सांगितले. मात्र, चीन पाकिस्तानचा जवळचा सहकारी आहे. त्यामुळे चिनी परराष्ट्रमंत्र्यांनी सावधपणे वक्तव्य करताना पाकिस्तानही दहशतवादाच्या विरोधात असल्याचे या वेळी सांगितले.

चीनचे परराष्ट्रमंत्री वांग, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, तसेच रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जी लावरोव यांनी या बैठकीनंतर संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्या वेळी वांग बोलत होते. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचा मित्र म्हणून चीन विधायक भूमिका निभावत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. तिन्ही देशांच्या पररराष्ट्रमंत्र्यांची १६वी बैठक झाली. तिन्ही देशांनी दहशतवादाचा तीव्र शब्दांत निषेध केला. दहशतवादाविरोधातील संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी सहकार्य मजबूत करण्याचे आवाहनही तिन्ही देशांनी जागतिक समुदायाला केले. मूलतत्त्ववादी गटांना पाठिंबा द्यायला नको, तसेच दहशतवादी कारवायांना पाठिंबा देण्याऱ्यांना जबाबदार ठरवून त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी, असेही तिन्ही मंत्र्यांनी सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!