Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Pakistan : भारतीय हवाई दलाच्या कारवाईने पाकिस्तानात खळबळ : योग्य वेळी उत्तर देण्याची धमकी

Spread the love

भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या तळावर एअर स्ट्राइक केल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी राष्ट्रीय सुरक्षा समितीची तातडीची बैठक घेतली. भारतानं अवाजवी आक्रमकता दाखवली असून पाकिस्तान योग्य त्यावेळी व स्वत:च्या पसंतीच्या ठिकाणी प्रत्युत्तर देईल असं पाकिस्तानच्या वतीनं सांगण्यात आलं. राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक झाल्यानंतर इम्रान खान यांनी भारताला धमकी दिली आहे.
बालाकोट येथे हवाई दलाच्या मिराज २००० या लढाऊ विमानांनी दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केले असून या हल्ल्यात ३५० दहशतवादी मारले गेल्याचे वृत्त आहे. भारताच्या या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली असून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक बोलावली. या बैठकीला पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री, संरक्षण मंत्री, अर्थ मंत्री आणि पाकिस्तानमधील सुरक्षा दल व सैन्याचे प्रमुख उपस्थित होते.
इम्रान खान यांनी बैठकीनंतर भारताला धमकावले आहे. भारतानं अवाजवी आक्रमकता दाखवली असून पाकिस्तान योग्य त्यावेळी व स्वत:च्या पसंतीच्या ठिकाणी प्रत्युत्तर देईल. या पार्श्वभूमीवर पाकिस्तान संसदेचे संयुक्त अधिवेशन घेण्याचा निर्णय देखील बैठकीत घेण्यात आला, असे इम्रान खान यांनी सांगितले. पाकिस्तानी सैन्य आणि जनतेने सर्व प्रसंगांना सामोरे जायची तयारी ठेवावी, भारताचे बेजबाबदार धोरण आंतरराष्ट्रीय स्तरावर उघडे पाडले जाईल, असे इम्रान खान यांनी म्हटले आहे. बालाकोटमधील दहशतवादी तळांना लक्ष्य केल्याची आणि या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याचा भारताचा दावा आहे. पण आम्ही हा दावा फेटाळून लावतो. भारत सरकारने पुन्हा एकदा खोटा दावा केला आहे, असे इम्रान खान यांनी नमूद केले.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला करण्यात आला असून यामुळे उपखंडातील शांततेला आणि स्थैर्याला धोका निर्माण झाल्याचे इम्रान खान यांनी म्हटले आहे. भारताचा दाव्यातील तथ्य जगासमोर यावे, यासाठी आम्ही बालाकोटमधील ती जागा (भारताने हल्ला केलेला परिसर) सर्वांसाठी खुली करु, असे देखील इम्रान खान यांनी म्हटले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!