Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

आता एमपीएससीच्या धर्तीवर होणार राज्यात पोलीस भरती

Advertisements
Advertisements
Spread the love

राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार राज्य लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर पोलीस शिपाई पदांची भरती केली जाणार आहे. पोलीस भरतीकरिता अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांची प्रथम लेखी परीक्षा घेतली जाईल. लेखी परीक्षेत सर्वाधिक गुण घेऊन उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांचीच रिक्त पदानुसार शारीरिक क्षमता चाचणीसाठी निवड केली जाणार आहे. नव्या भरती पद्धतीमुळे पोलीस दलाला गुणवंत उमेदवार मिळतील, शिवाय महिनाभर चालणारी भरती प्रक्रिया जलदगतीने पूर्ण होणार आहे.
याविषयी पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे- घाडगे म्हणाल्या की, राज्य पोलीस दलातील शिपाई पदासाठी गतवर्षीपर्यंत झालेल्या भरती प्रक्रियेंतर्गत उमेदवारांची प्रथम मैदानी चाचणी होते. जे उमेदवार मैदानी चाचणीत सर्वाधिक गुण घेऊन उत्तीर्ण होत त्यांची लेखी परीक्षेसाठी निवड केली जात असे आणि शेवटी लेखी आणि मैदानी चाचणीतील गुणांची बेरीज करून उमेदवारांची अंतिम निवड होत असे. या प्रक्रियेनुसार अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणी घेण्यासाठी पंधरा दिवस ते एक महिन्याचा कालावधी लागत होता. त्यामुळे भरती प्रक्रियेत पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा वेळ जात असे.
काही वर्षांपासून महाराष्ट्र पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या कामाच्या स्वरुपात आता बदल झाला आहे. गुन्ह्यांचे स्वरूपही बदलले आहे. सायबर गुन्हे, आर्थिक गुन्ह्यांची संख्याही वाढत आहे. अशा गुन्ह्यांची जलदगतीने आणि अचूक उकल करण्यासाठी पोलीस दलात आता सक्षम उमेदवारांची निवड होणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्य शासनाने पोलीस भरती प्रक्रियेत अंशत: बदल केला. आता अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांची एमपीएससीच्या धर्तीवर लेखी परीक्षा होईल. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणीसाठी निवड होईल. त्यात सर्वाधिक गुण घेणाऱ्या उमेदवारांची उपलब्ध जागेनुसार पोलीस दलात निवड होईल.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!