Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

भाजप -सेनेकडून महादेव जानकरांना हव्यात लोकसभेच्या ५ जागा

Spread the love

महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाने भाजप-सेना युतीकडे पाच जागांची मागणी केली आहे. आगाली लोकसभा निवडणुकांसाठी राष्ट्रीय समाज पक्षाला ५ जागा देण्यात याव्यात, अशी आमची मागणी असल्याचे राष्ट्रीय समाज पक्षाने प्रवक्ते प्रा. लक्ष्मण हाके यांनी आज पुण्यातील पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने येत्या ५ मार्च रोजी मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर महामेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, युतीचं गणित निश्चित झाल्यानंतर आता भाजपकडून रासपला जागा देण्यात येतील, हा खरा प्रश्न आहे. राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या महामेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तर रासपचे अध्यक्ष महादेव जानकर, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे व शिवसेना नेते व परिवहनमंत्री दिवाकर रावते हेही उपस्थित असणार आहेत.
महामेळाव्याच्या पार्श्वभूमीवर धनगर समाजासोबतच मुस्लिम आरक्षणप्रश्नी अंतिम निर्णय घ्यावा आणि लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाला पाच जागा द्याव्यात या प्रमुख मागण्यांसह इतरही मागण्या राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने करण्यात आल्या आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप व शिवसेनेमध्ये जागा वाटप निश्चित झाले आहे. मात्र, मित्रपक्षाला एकही जागा देण्यात आली नाही. रासप हा भाजपाचा मित्र पक्ष आहे. त्यामुळे भाजपाकडून याबाबत विचार होईल, असेही हाके यांनी पत्रकार परिषदेत म्हटले. दरम्यान, भाजप शिवसेनेची युती निश्चित झाली असून भाजपा २५ जागांवर तर शिवसेना २३ जागांवर निवडणूक लढवणार असल्याचा फॉर्म्युला फिक्स झाला आहे. त्यातच दक्षिण मुंबईची जागा आपल्याला न मिळाल्यामुळे रामदास आठवलेही नाराज आहेत. आता, रासपकडूनही लोकसभेसाठी पाच जागांची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे युती गणित जरी जुळलं असले तरी, महायुतीचं कसं जुळणार हे पाहणे येणाऱ्या काळात निश्चितच औत्सुक्याचे ठरणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!