दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध सामाजिक संस्थांशी सामंजस्य करार

दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी महापरिवर्तन भागीदार विकासाच्या अंतर्गत विविध सामाजिक संस्थांसोबत सामंजस्य करार करण्यात आले असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली.
महापरिर्वतन भागीदार विकासाच्या अंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि विविध सामाजिक संस्था यांच्याशी आज मंत्रालयात विविध सामंजस्य करार करण्यात आले. त्यावेळी श्री.बडोले बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांचे वैद्यकीय सल्लागार डॉ. आनंद बंग व विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी श्री. बडोले म्हणाले, दिव्यांगांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व अन्य समस्या सोडविण्यासाठी सामाजिक संस्थांचा सहभाग वाढविण्यासाठी या सामाजिक संस्थांबरोबर सामंजस्य करार करण्यात आले आहेत. यामध्ये गतिमंद मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी त्यांचा अभ्यासक्रम विकसित करण्यासाठी प्रयत्न करणे, दिव्यांगांच्या विविध शासकीय योजनांची माहिती दिव्यांगांपर्यंत पोहोचविणे, दिव्यांगांच्या कौशल्य विकासासाठी प्रयत्न करणे, त्या अनुषंगाने त्यांना रोजगार उपलब्ध करणे, दिव्यांगांच्या विम्यासाठी प्रयत्न करणे, दिव्यांगांच्या विविध समस्यांबाबत सर्वेक्षण करणे तसेच गोंदिया जिल्ह्यातील 20 गावांमध्ये स्वच्छ पाणी पुरविण्यासाठी वॉटर एटीएमची सुविधा निर्माण करुन यामध्ये गावकऱ्यांचा सहभाग वाढविणे आदींबाबत या सामाजिक संस्था काम करणार आहेत. जय वकील फाऊंडेशन, रिलायन्स फाऊंडेशन, डीड्स फाऊंडेशन, टाटा स्ट्राईव्ह, टाटा ट्रस्ट, सेफ वॉटर नेटवर्क आदी संस्थांशी सामंजस्य करार करण्यात आले.
कार्यक्रमास जय वकील फाऊंडेशनच्या अर्चना चंदा, रिलायन्स फाऊंडेशनचे दिपक केकाण, डीड्स फाऊंडेशनचे कपिल मल्होत्रा, टाटा स्ट्राईव्हच्या अनिता राजन, सेफ वॉटर नेटवर्कच्या पूनम सेवक आदी उपस्थित होते.