Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

आगामी पंतप्रधान भाजपा नव्हे तर एनडीए ठरवेल : संजय राऊत

Spread the love

भाजपाने २०१४ मधील निवडणुकीपेक्षा १०० जागा कमी जिंकल्यास आगामी पंतप्रधान भाजपा नव्हे तर राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) ठरवणार, असे सूचक विधान शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केले आहे. संजय राऊत यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला मुलाखत दिली असून या मुलाखतीत त्यांनी युतीविषयी भाष्य केले आहे.
आम्ही भाजपासमोर अशी कोणतीही अट ठेवलेली नाही. आणि फक्त गडकरीच का?, भाजपाकडे अनेक चेहरे आहेत. भाजपाने गेल्या वेळी पेक्षा (२०१४ पेक्षा) यंदा १०० जागा कमी जिंकल्यास आगामी पंतप्रधान भाजपा नव्हे तर एनडीए ठरवणार, असे त्यांनी सांगितले. नितीन गडकरी आणि पंतप्रधानपद यासंदर्भात प्रश्न विचारला असता संजय राऊत म्हणाले, मी पंतप्रधानपदासाठी नितीन गडकरी यांना पाठिंबा दिलेला नाही. प्रसारमाध्यमं आणि संघाकडून अशा बातम्या पेरल्या जातात.
गेल्या चार वर्षांत शिवसेनेने विविध मुद्द्यांवरुन टीका केली होती. आता तोच पक्ष नरेंद्र मोदींसोबत निवडणुकीत उतरणार आहे, याकडे लक्ष वेधले असता संजय राऊत म्हणतात, आम्ही शेतकऱ्यांच्या जमिनीवर स्मार्ट सिटी किंवा उद्योगधंदे सुरु करु देणार नाही. म्हणून आम्ही भूसंपादन कायद्याला विरोध दर्शवला. बुलेट ट्रेन प्रकल्पात शेतकऱ्यांची जमीन जाणार असल्याने आमचा या प्रकल्पाला विरोध आहे. नोटाबंदीमुळे बेरोजगारी वाढली असे आमचे मत आहे. शिवसेना नेहमी सत्याची बाजू घेणारा पक्ष म्हणून ओळखला जातो. आमचा विरोध सरकारी धोरणांना होता, असे त्यांनी सांगितले.
राज्यात भाजपा कधीही शिवसेनेची जागा घेऊ शकत नाही. विद्यमान भाजपा ही आधीसारखी भाजपा नाही. सध्याच्या भाजपामधील अर्ध्याहून अधिक नेते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून आले आहेत. त्यांना पक्षात घेतले म्हणजे शिवसेनेची जागा मिळवता येईल, असे होणार नाही. महत्त्वाचे म्हणजे तुम्ही शिवसेनेची जागा घ्यालही, पण शिवसेनेसारखी मर्दानी हिंमतीची छाती कुठून आणणार, असा सवालही राऊत यांनी भाजपाला विचारला आहे.
विधानसभा निवडणुकीत शिवसेनेपेक्षा जास्त जागा २०१४ मध्ये भाजपाला मिळाल्या होत्या. पण तरी देखील २०१९ मधील निवडणुकीत शिवसेना आणि भाजपामध्ये समान जागा वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यात आम्हीच मोठा भाऊ असून सत्ता आल्यास मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल, असे त्यांनी सांगितले. मात्र, शिवसेनेचा मुख्यमंत्री पाच वर्षाची टर्म पूर्ण करणार का, या प्रश्नाचे त्यांनी उत्तर देणे टाळले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!