Spread the love

बोलेल तो करेल काय आणि गरजेल तो पडेल काय ?

याचीच अनुभूती जणू भाजप-सेने युतीने लोकांना आली आहे . सतत साडेचार वर्षे एकमेकांना शिव्या घालत , एकमेकांवर आरोप -प्रत्यारोपांच्या फैरी झाडत , कुरबुर करीत राजकीय संसार करणाऱ्या सेना-भाजपने अखेर काडी मोड न घेता “अवघाचि संसार सुखाचा करिन “ या उक्तीप्रमाणे पुन्हा एकदा गळ्यात गळे घालून “तुझ्या गळा , माझ्या गळा , गुंफू सत्तेच्या माळा “ असेच जणू ठरविले आहे.
मुळात आम्ही पहिल्यापासून या भाजप-सेनेला ” सयामी जुळे “ असे संबोधले आहे . त्याचे कारण असे आहे कि , सयामी जुळ्यांचे ऑपरेशन सहसा यशस्वी होत तशातली या दोन्हीही पक्षांची गत आहे . असे ऑपरेशन झाले तर दोघांचाही मृत्यू अटळ हे अंतिम सत्य दोघांनाही चांगले माहीत असल्यामुळे हि युती केल्याशिवाय गत्यंतर नव्हते हे उघडच होते .
दरम्यानच्या काळात या दोन्हीही पक्षाच्या नेत्यांनी काय काय धुणी धुतली ?  याची मराठी जनतेला चांगलीच माहिती आहे . अगदी अखेरच्या घटिकेपर्यंत सेना, भाजपाला पाण्यात पाहत होती परंतु हे अखेर पाण्याचे बुडबुडे निघाले असेच म्हणावे लागेल. एखाद्या नवऱ्याने किंवा बायकोने घटस्फोटाचा कागद कायम सोबत घेऊन फिरावे तसे राजीनाम्याचा कागद खिशात घेऊन सेनेचे मंत्री फिरत होते . यावरून त्यांची मोठी शोभा झाली पण ” सत्तातुराना भय ना लज्जा “ अशी हि अवस्था . अर्थातच सत्तेमुळेच आलेली . शिवसेनेने सत्तेपुढे स्वाभिमान गहाण टाकला अशीच भावना यातून निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही.पण त्याला आजच्या चालू जमान्यात काहीही अर्थ नाही !!  उद्धव ठाकरे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना “अफजल खान” संबोधायचे पण ते प्रेमाचे विशेषण होते असेच आता म्हणावे लागेल . जसे आपल्याकडे मराठी आई लाडात आल्यावर आपल्या लाडक्या मुलाला ” लबाडा , दुष्मना” म्हणते तसे !!  हे लटकेची बोलणे होते हे ओघाने दिसतेच आहे .
अर्थात काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या युतीचा चांगलाच समाचार घेतला आहे . पण त्यांचे हे बोलणेही तसे शिष्टाईचेच !! मावळत्या सरकारात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारात राष्ट्रवादीने काय केले होते याचाही इतिहास लोकांना चांगलाच माहित आहे . किंबहुना काँग्रेसबरोबर राष्ट्रवादीसुद्धा किती इमाने इतबारे आहे ? याचीही माहिती सर्वश्रुत आहे . पण तत्वहीन आणि कणाहीन राजकारणात अपेक्षा तरी कोणाकडून ठेवणार ? इथे सत्तेसाठी असंगाशी संग करण्यातच आनंद मनाला जातो . त्यामुळे ” उडदामाजी काळे गोरे काय निवडावे निवडणाराने ?”अशी अवस्था आहे .
मुळात राष्ट्रवादीवर कोणाचाही विश्वास नाही . सत्तेसाठी राष्ट्रवादी काय करू शकते याची प्रचिती २०१४ मध्येच आली आहे.. अगदी काँग्रेस नेतृत्वालाही राष्ट्रवादीवर भरवसा नाही पण “नही मामुसे नकटा मामूही सही” म्हणून त्यांना अनेकांशी जुळवून घ्यावे लागत आहे . मुळात मागच्या वेळी चक्क स्थिर सरकारच्या नावाखाली प्रतिगामी म्हणविणाऱ्या भाजपलाही पाठिंबा देण्याची राष्ट्रवादीची तयारी होती हे लोक विसरले असतील ? ? अगदी सेना -भाजपचे आता तुटणार असे जेंव्हा जेंव्हा वाटत होते तेंव्हा तेंव्हा लोक राष्ट्वादीकडे संशयाने पाहत होते .  सेनेचे खिशातले राजीनामे खिशात राहण्याचे हे सुद्धा एक कारण होते . कि , न जाणो आपण भरला संसार अर्ध्यावर सोडला तर राष्ट्रवादी भाजपच्या घरात घुसायाचे !! शिवसेनेचे रडत -पडत , शिव्याशाप देत भाजपबरोबर गुमान संसार करण्यामागे हे सुद्धा एक कारण होते.
बाकी काहीही असो सेना -भाजप युती कायम ठेवण्यात शहांचे कसब कामी आले आहे . या निर्णयामुळे भाजप-सेनेचा निष्ठवंत कार्यकर्ता सुखावला असला तरी यंदा ” कर्तव्य आहे !! या भावनेने भाळी खासदारकी आणि आमदारकीचे बाशिंग बांधून तयार असलेली मंडळी मात्र नक्कीच आतून दुखावलेली असणार . पण भाजपाला अशा हौशी नवरदेवांपेक्षा मोदी सरकार ठिकविण्याचे आव्हान मोठे आहे . मग भले कोणी त्यांना गोलमाल रिटर्न म्हणो अगर कोणी काहीही म्हणो .

अर्थात महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचे झाले तर २०१९ ची निवडणूक तशी साधी आणि सोपी निवडणूक नाही कारण लोक भाजप -सेनेच्या सरकारवर कमालीचे नाराज आहेत . शेतकरी असो कि व्यापारी पुरता नागवला गेल्याची भावना आहे . बेरोजगार त्रस्त आहेत . विद्यार्थी , तरुण अस्वस्थ आहेत. कधी एकदाची निवडणूक येते याची सगळ्यांनाच वाट आहे कि या निवडणुकीत कोणा -कोणाची वाट लावता येईल ? सरकराने आपल्या विकास कामाचा कितीही रवन्थ केला तरीही प्रत्यक्षात जनतेची काय अवस्था झाली आहे याचा कोणालाही प्रचार करण्याची गरज नाही . आपल्यावरील टीकेला सत्ताधारी भाजप सेनेचे सरकार सामोरे कसे जाणार ? हे पाहणे नक्कीच औत्सुक्याचे ठरणार आहे .

मराठा आरक्षण , धनगर आरक्षण , १३ पॉईंट रोस्टर , मुस्लिम आरक्षण हे सरकारसाठी ऐरणीवरचे मुद्दे आहेत . या ज्वलंत प्रश्नांच्या सुनामीत मोदी सरकारच्या निर्णयावर जनता शिक्कामोर्तब करते कि , त्यांना पाय उतार करते याची चर्चा लवकरच सुरु होईल . पुलवामा येथी दहशतवादी हल्ल्याने राजकीय चर्चा थंड बस्त्यात घालविण्याचे प्रयत्न होत असले तरी अनेक अशा जखमा आहेत ज्या निवडणूक काळात चिघळल्याशिवाय राहणार नाहीत असे चित्र आहे .
या सर्व पार्श्वभूमीवर सेनेची अवस्था मात्र “ना ना करते प्यार तुम्हीसे कर बैठे … “ या गाण्या सारखी झाली आहे . काल दिवस मावळला तेंव्हा आधी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि त्यांच्या मित्र पक्षांची आघाडी , त्यांचा नांदेडात तर राष्ट्रवादीचा परळी वैजनाथ येथे फुटणारा नारळ आणि तिसऱ्या बाजूला भारिप -बहुजन महासंघाचे नेते ऍड . प्रकाश आंबेडकर यांची वंचित आघाडी राहणार असल्याच्या बातम्या क्लियर झाल्या आहेत . राहता राहिली मनसे !! त्यांचाही निर्णय लवकरच जाहीर होईल . तोपर्यंत वाचत राहा , पाहत रहा आणि चर्चा करत राहा … चर्चा तर होणारच !!

3 thoughts on “ना ना करते प्यार तुम्हीसे कर बैठे …

  1. साडे चार वर्षें या दोन्ही पक्षांनी जे भांडणाचे जे नाटके केलीत ती फक्त त्यांच्या कार्यकर्त्यांना अक्षरशः मुर्ख बनवण्यासाठी केले. कारण यांनी भांडणे केलीत ती यासाठी की महामंडळाच्या नियुक्त्या, अशासकीय सदस्य पदे ही कार्यकर्त्यांना वाटावी लागतात, ही पदे कार्यकर्त्यांना वाटता येऊ नये म्हणून या पक्षांच्या वरीष्ठ नेत्यांनी सतत साडेचार वर्षे भांडणाचे नाटक केलेले दिसते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *