Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

हिंमत असेल, तर हल्ल्यासाठी जबाबदार लोकांना जाहीर फाशी द्या : सिद्धू

Spread the love

पुलवामातील दहशतवादी हल्ल्याबद्दल केलेल्या विधानामुळे वादात सापडलेले काँग्रेस नेते नवजोत सिंग सिद्धू यांनी भाजपावर पलटवार केला आहे. पुलवामात दहशतवादी हल्ला घडवणाऱ्या मसूद अजहरची २० वर्षांपूर्वी कोणी सुटका केली होती, असा सवाल उपस्थित करत त्यांनी भाजपावर निशाणा साधला. १९९९ मध्ये कंदहार विमान अपहरण प्रकरण घडलं होतं. त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींनी अजहरची सुटका केली होती. २० वर्षांपूर्वी घडलेल्या त्या घटनेचा संदर्भ देत सिद्धू यांनी भाजपावर टीका केली.
‘आज जे मला देशद्रोही म्हणत आहेत, त्या लोकांनीच अजहरची सुटका केली आणि त्याला पाकिस्तानला पाठवलं. त्यानंतर इतकी वर्ष त्याला अटक करुन देशात आणण्यासाठी त्यांनी काय केलं?’ असा सवाल सिद्धू यांनी विचारला. हितसंबंध अडकलेल्या काहींनी माझ्या विधानाचा अनर्थ केला, असा दावादेखील त्यांनी केला. ‘राष्ट्रवाद हाच सर्वात मोठा धर्म आहे आणि मी माझ्या देशासोबत आहे. पुलवामा हल्ल्यानंतर ज्या भावना देशवासीयांच्या मनात आहेत, त्याच माझ्या मनात आहेत. देशाचा आवाज हाच माझाही आवाज आहे. मी माझ्या पक्षाच्या भूमिकेशी पूर्णपणे सहमत आहे,’ असं सिद्धू म्हणाले.
प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सिद्धू यांनी त्यांच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. ‘या हल्ल्यामागे काही जण आहेत. अशा कारवायांमागे काही मोजकी माणसं आहेत. त्यांच्या कृत्यांची शिक्षा सामान्य माणसाला, निष्पाप महिलांना, लहानग्यांना मिळू नये, असं मला वाटतं. कारण अशी कृती शिख गुरुंच्या आणि मानवतेच्याही विरोधातली आहे. मात्र या हल्ल्यामागे असलेल्या प्रत्येकाला शिक्षा मिळायलाच हवी, यावर मी ठाम आहे,’ अशा शब्दांमध्ये सिद्धू यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.
जर तुमच्यात हिंमत असेल, तर हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांना देशात घेऊन या आणि त्यांना जाहीर फाशी द्या, असं म्हणत सिद्धू यांनी मोदी सरकारला थेट आव्हान दिलं. भारतानं शांततेसाठी खूप प्रयत्न केले आहेत. काही प्रवृत्तींमुळे या प्रयत्नांना धक्का पोहोचू नये, असं सिद्धू म्हणाले. पुलवामा हल्ल्यानंतर केलेल्या विधानामुळे सिद्धू यांच्या चौफेर टीका झाली होती. या हल्ल्यानंतर सर्व देशात पाकिस्तानविरोधात संतापाची भावना असताना, काही मोजक्या लोकांमुळे एका देशाला दोषी धरता येणार नाही, असं सिद्धू यांनी म्हटलं होतं.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!