ह्रदयद्रावक : मुलीला गळफास देऊन आईचीही आत्महत्या

Spread the love

तीन वर्षांच्या मुलीला गळफास देऊन आईनेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना रविवारी (१७ फेब्रुवारी) संध्याकाळी पाचच्या सुमारास बेगमपुरा परिसरातील थत्ते हौदाच्या समोर घडली. अमृता किशोर मुळे (वय २२) आणि अवंतिका मुळे (वय ३) अशी मृतांची नावे आहेत. अमृताच्या वाढदिवशीच ही घटना घडल्यानं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची बेगमपुरा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, अमृता मुळे यांचा रविवारी वाढदिवस होता. तो साजरा करण्याचा निर्णय किशोर आणि अमृता यांनी घेतला होता. रोजच्या प्रमाणे अमृता ही दुपारी दीडच्या सुमारास मुलीला घेऊन दुसऱ्या मजल्यावरील खोलीत झोपण्यासाठी गेली होती. किशोरदेखील हॉलमध्ये झोपला होता. संध्याकाळी पाच वाजले तरी अमृता आणि आवंतिका या उठल्या नाहीत म्हणून कुटुंबीयांनी खोलीचा दरवाजा ठोठावला. मात्र आतून काहीच प्रतिसाद आला नाही. अखेर किशोर आणि कुटुंबीयांनी खोलीचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. समोरील दृश्य बघून सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. अवंतिका आणि अमृता दोघीही लटकलेल्या अवस्थेत होत्या. छताला असलेल्या लोखंडी हुकाला साडीच्या साह्याने गळफास घेतला होता. या घटनेची माहिती तात्काळ बेगमपुरा पोलिसांना देण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद बदक आणि अन्य कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. दोघींनाही पावणे सातच्या सुमारास घाटीत उपचारासाठी आणण्यात आले. घाटी रूग्णालयातील डॉक्टरांनी दोघींनाही मृत घोषित केले. बेगमपुरा पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून अकस्मात मृत्युची नोंद केली. मुळे कुंटबीय या भागात सर्वांशी मिळून-मिसळून राहतात. घरात कधीही भांडणं झाली नाहीत, अशी माहिती शेजाऱ्यांनी दिली. घटनास्थळी चिठ्ठी किंवा अन्य काही वस्तू सापडल्या नाहीत. त्यामुळे आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *