Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

सत्तेसाठी सेनेची मांडवली तर भाजपची पराभूत मानसिकता : विखे पाटील

Spread the love

चारच महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरेंनी भाजपला निर्लज्ज म्हटले होते. ‘चौकीदार चोर है’चा नाराही त्यांनी बुलंद केला होता. भाजपशी युती करण्याचा निर्णय घेऊन शिवसेनेने पुन्हा एकदा मांडवली हाच आपला एकमेव आणि एककलमी कार्यक्रम असल्याचे सिद्ध केले आहे. अगदी आजसुद्धा सामनाच्या अग्रलेखात भाजप पुलवामातील शहिदांच्या मढ्यावरचे लोणी खात असल्याचे शिवसेनेने म्हटले होते, याची आठवण करून देत विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजप-सेने युतीची खिल्ली उडविली. ते पुढे म्हणाले कि , शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्येत राम मंदिराचे बांधकाम सुरू होईपर्यंत आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळेपर्यंत युतीची चर्चा नाही, असे जाहीर केले होते. पण आजपर्यंत ना राम मंदिराचं बांधकाम सुरू झाले, ना दुष्काळग्रस्तांना भरीव मदत मिळाली. तरीही नेमकी काय चिरीमिरी घेऊन उद्धव ठाकरेंनी भाजपशी मांडवली केली, याचे उत्तर त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला द्यावे, भाजपने ‘ईडी’ची भीती दाखवून शिवसेनेला या युतीसाठी भाग पाडले असावे, अशी माहिती असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
हि तर भाजपची पराभूत मानसिकता
शिवसेना तर शिवसेना पण ‘पार्टी विथ डिफरन्स’ची वल्गना करणाऱ्या भाजपनेही स्वाभिमान गहाण ठेवल्याचे या युतीतून स्पष्ट होते. आजचे भाजपचे दोन्ही सर्वात मोठे नेते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह या दोघांवरही शिवसेनेने वारंवार पातळी सोडून टीका केली. आपल्या राष्ट्रीय नेत्यांचा इतका जाहीर अपमान झाल्यानंतरही भाजपला शिवसेनेच्या दारात जावे लागले, यातून त्यांची पराभूत मानसिकता स्पष्ट होत असल्याचेही राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. जे कालपर्यंत एकमेकांची औकात काढत होते, जबड्यात हात घालून दात मोजण्याची भाषा करीत होते, तेच आज पुन्हा केवळ सत्तेसाठी एकमेकांच्या गळ्यात गळे घालायला निघाले आहेत. ही युती महाराष्ट्राच्या जनतेची मोठी फसवणूक आहे. पण महाराष्ट्राची जनता सूज्ञ आहे. अशा अनैतिक, अभद्र आणि स्वार्थी, मतलबी युतीला धडा शिकवायचा, हे जनतेने अगोदरच ठरवून टाकले आहे, असा इशाराही विखे पाटील यांनी यावेळी दिला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!