Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

काँग्रेस उमेदवारांची काही नावे निश्चित; अकोल्याची जागा प्रकाश प्रकाश आंबेडकरांना

Spread the love

काँग्रेस उमेदवारांची काही नावे निश्चित तर काही नवे दिल्लीत !!
राज्यातील काँग्रेस उमेदवारांची काही नावे निश्चित झाली असून काही जागांची नावे दिल्लीतून ठरतील असे जाहीर करण्यात येतील असे सांगितले जात आहे. निशिचीत झालेल्या नावांमध्ये सुशीलकुमार शिंदे, मिलिंद देवरा, मुकूल वासनिक, माणिकराव ठाकरे अशोक चव्हाण यांची पत्नी अमिता, राजीव सातव यांचा समावेश असून पुणे, नागपूरसह एकापेक्षा जास्त इच्छुक असलेल्या मतदारसंघांतील उमेदवारांचा निर्णय दिल्लीत घेतला जाईल.
काँग्रेसचे राज्याचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षाच्या छाननी समितीची बैठक गुरुवारी रात्री पार पडली. अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात आदी नेते या प्रसंगी उपस्थित होते. काँग्रेसच्या वाटय़ाला गेल्या वेळी २६ जागा आल्या होत्या. या मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. यंदा पक्षाच्या वाटय़ाला २५ जागा येतील, अशी शक्यता गृहीत धरून काँग्रेसने व्यूहरचना आखली आहे. सुशीलकुमार शिंदे (सोलापूर), माणिकराव ठाकरे (यवतमाळ-वाशिम), मुकूल वासनिक (रामटेक), मिलिंद देवरा (दक्षिण मुंबई), खासदार राजीव सातव (हिंगोली), अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता (नांदेड), चारुलता टोकस (वर्धा) यांच्या एकमेव नावांची अ. भा. काँग्रेस समितीला शिफारस करण्यात आली. यामुळे या नेत्यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. पुण्यात मोहन जोशी व अभय छाजेड यांच्या नावाची शिफारस करण्यात आली असली तरी भाजपपासून फारकत घेणारे राज्यसभा खासदार संजय काकडे यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. नागपूर काँग्रेसमध्ये मोठय़ा प्रमाणावर गटबाजी आहे. नितीन गडकरी यांच्या विरोधात उमेदवार कोण असावा याचा निर्णय दिल्लीतच घेतला जाईल. या पार्श्वभूमीवर नागपूरचा उमेदवार वरिष्ठ पातळीवर ठरविण्यात येईल. धुळ्यात माजी मंत्री रोहिदास पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. लातूरमध्ये उमेदवारीसाठी स्पर्धा असल्याने शिवराज पाटील, शिवाजीराव निलंगेकर पाटील, अमित देशमुख यांनी एकत्र बसून उमेदवार निश्चित करावा, असा निर्णय घेण्यात आला. अकोल्याची जागा प्रकाश आंबेडकर यांना सोडण्याची पक्षाची तयारी आहे.
दक्षिण मुंबईत मिलिंद देवरा यांचे एकमेव नाव आले आहे. दक्षिण मध्य- मुंबईत माजी खासदार एकनाथ गायकवाड आणि डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्यात स्पर्धा असली तरी गायकवाड यांना उमेदवारी मिळेल, अशी शक्यता आहे. उत्तर पश्चिम मतदारसंघात संजय निरुपम हे इच्छुक असले तरी कृपाशंकर सिंह यांचेही नाव पॅनेलमध्ये समाविष्ट करण्यात आले. उत्तर मध्य मतदारसंघात प्रिया दत्त यांनी नकार दिल्याने माजी मंत्री सुरेश शेट्टी यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकते. माजी मंत्री नसिम खान आणि कृपाशंकर सिंह यांच्या नावांचा पॅनेलमध्ये समावेश करण्यात आला आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा जाणीवपूर्वक राष्ट्रवादीला सोडण्यात येणार आहे. भाजप-शिवसेना युती झाल्यास आपला मार्ग वेगळा असेल, असे माजी मुख्यमंत्री व भाजप खासदार नारायण राणे यांनी जाहीर केल्याने त्यांना पाठिंबा देण्याची आघाडीची योजना आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!