Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पुलवामा हल्ला: काँग्रेसची मोदी सरकारवर टीका

Spread the love

पुलवामा हल्ल्यानंतर देशभरातून संतापाची लाट उसळली असताना काँग्रेसने या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करत केंद्रातील मोदी सरकारकडून राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड केली जात असल्यानेच दहशतवादी हल्ल्यांची यादी वाढत आहे, अशा शब्दांत टीकास्त्र सोडले आहे.
‘उरी, पठाणकोट, पुलवामा… दहशतवादी हल्ल्यांची यादी वाढत आहे. मोदी सरकार गप्प आहे. राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड केली जात आहे’, अशा शब्दांत काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सरकारच्या धोरणांवर निशाणा साधला.
मोदी सरकारच्या पाच वर्षांच्या काळात १७ दहशतवादी हल्ले झाले. दहशतवादी आपल्या जवानांचे शीर नेतात आणि सरकार मात्र त्यावर केवळ बघ्याची भूमिका घेतं, असा संताप व्यक्त करताना पाकिस्तानला ५६ इंची छाती कधी दाखवणार आहात? या हल्ल्याचा बदला केव्हा घेतला जाणार?, अशा प्रश्नांची सरबत्तीच सुरजेवाला यांनी केली.

गुप्तचर यंत्रणांनी सात दिवस आधीच याबद्दलचा अलर्ट जारी केला होता.

काश्मीरमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला होऊ शकतो, जवानांच्या ताफ्यावर आयईडीच्या मदतीनं दहशतवादी हल्ला करु शकतात, असा अलर्ट देण्यात आला होता.संसदेवरील हल्ल्याचा दोषी अफजल गुरुच्या फाशीला सहा वर्षे पूर्ण होत असल्यानं दहशतवाद्यांकडून हल्ला घडवला जाऊ शकतो. त्यामुळे सतर्क राहण्याच्या सूचना गुप्तचर विभागानं दिल्या होत्या. याशिवाय जेकेएलएफचा संस्थापक मोहम्मद मकबूल भट्टच्या फाशीला 35 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हल्ला घडवला जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. 8 फेब्रुवारीला याबद्दलचा अलर्ट जारी करण्यात आला होता. दहशतवाद्यांनी हल्ल्याची संपूर्ण योजना आखल्याची माहिती यामधून देण्यात आली होती.

सीआरपीएफच्या किंवा पोलिसांच्या तळांवर दहशतवादी मोठा हल्ला घडवू शकतात, असा स्पष्ट अलर्ट देण्यात आला होता. त्यामुळे सतर्क राहण्याच्या सूचनाही दिल्या गेल्या होत्या. ज्या भागात सुरक्षेसाठी जात आहात, तिथल्या परिस्थितीचा आधी संपूर्ण आढावा घ्या, असं अलर्टमध्ये सांगण्यात आलं होतं. मात्र तरीही सुरक्षा दलांकडून चूक झाली आणि दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला करण्यासाठी रस्त्याच्या शेजारी असलेल्या एका गाडीत स्फोटकांचा साठा ठेवला होता. सीआरपीएफचा ताफा या रस्त्यावरुन जाऊ लागताच ही गाडी त्या ताफ्यावर जाऊन धडकली आणि मोठा स्फोट झाला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!