Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पवारांच्या घरात मोदी यांच्याविरुद्ध व्यूहरचना

Spread the love

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर आव्हान उभे करण्यासाठी विरोधकांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू असून आज दुपारी विरोधी पक्षनेत्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मेळाव्यात एकजूट दाखवल्यानंतर रात्री पुन्हा एकदा सर्व दिग्गज नेते राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी व्यूहरचना आखण्यासाठी एकत्र आले.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, अरविंद केजरीवाल, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ला असे प्रमुख नेते पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या महाबैठकीला हजर होते. सुमारे पावणेदोन तास चाललेल्या या बैठकीत विविध मुद्द्यांवर खल करण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध लढाई आणि भाजपचा पराभव हे आमचे प्रमुख लक्ष्य असून संवैधानिक संस्था नष्ट करणाऱ्यांना सत्तेतून हटवण्यावर आमचे सर्वांचे एकमत असल्याचे राहुल गांधी यांनी बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. किमान समान कार्यक्रमावर लवकरच चर्चा सुरू करण्याचा निर्णय आज घेण्यात आला. एकंदर आजच्या बैठकीतील चर्चा सकारात्मक होती, असेही राहुल यांनी नमूद केले.
ममता बॅनर्जी यांनी लोकसभा निवडणुका जवळ आल्याने चांगला समन्वय राहावा म्हणून अशा बैठका आता वारंवार होतील, असे सांगत आम्ही सगळे एकजूट असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान मोदी यांचा पराभव करण्यासाठी ‘युनायटेड इंडिया’ ही आघाडी उभी राहत असून आमची आघाडी निश्चितच यशस्वी होईल, असा विश्वासही ममता यांनी व्यक्त केला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!