Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

वंचित आघाडीचे पाच उमेदवार जाहीर : प्रकाश आंबेडकर

Spread the love

बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी रात्री कोल्हापूर येथे झालेल्या सभेत लोकसभा निवडणुकीसाठी ५ उमेदवार जाहीर केले. सुप्रिया सुळे यांच्या बारामती मतदारसंघासह पश्चिम महाराष्ट्रातील हे उमेदवार आहेत. राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी पक्षीय चर्चा सुरु आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी या दोन्ही काँग्रेसने एकत्रित निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. याचवेळी उभय काँग्रेसने अन्य पुरोगामी विचारांच्या पक्ष, आघाडी यांच्याशी बोलणी सुरु ठेवण्याची भूमिका घेतली आहे. त्यामध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या बहुजन वंचित आघाडीचा समावेश आहे. मात्र, दोन्ही काँग्रेसकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची भावना आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी राज्यातील ४८ पैकी १२ जागा मिळाव्यात अशी मागणी केली आहे.
मंगळवारी वंचित आघाडीची कोल्हापुरात सभा आयोजित केली होती. आंबेडकर यांनी सभेच्या सुरुवातीलाच लोकसभेच्या ५ मतदारसंघात थेट उमेदवारांची घोषणा केली. हे सर्व मतदारसंघ दोन्हीही काँग्रेसची ताकद असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील आहेत. त्यात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात बारामती मतदारसंघात नवनाथ पडळकर या उमेदवाराची घोषणा केली आहे. त्याशिवाय पुणे- विठ्ठल सातव, सातारा- सहदेव आयवळे, माढा- विजय मोरे, सांगली- जयसिंग शेंडगे या उमेदवारांनाही आखड्यात उतरवण्याची घोषणा करीत आंबेडकर यांनी बार उडवून दिला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!