Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

भाजप -सेनेत जागा वाटपावरून जुंपण्याचे संकेत !!

Spread the love

देशभरात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजत असताना राज्यात मात्र विधानसभेवरून युतीचे घोडे अडले आहे. शिवसेनेने भाजपाला कात्रीत पकडण्याचे ठरविले आहे. यामुळे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतानाचा युतीचा फॉर्म्युला त्यांनी पुढे केला आहे. आधी विधानसभेचा फॉर्म्युला मान्य करा त्यानंतर लोकसभेचे ठरवू, असा इशारा शिवसेनेने दिल्याने मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनविण्यासाठी भाजपाला झुकावे लागणार असल्याची शक्यता आहे. याबाबत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यामध्ये चर्चा झाल्याचे समजते.
महाराष्ट्र विधानसभेच्या 1995 च्या निवडणुकीत शिवसेनेने 171 आणि भाजपाने 117 जागा लढविल्या होत्या. सहाजिकच शिवसेनेच्या जागा जास्त आल्याने युती सरकारच्या काळात शिवसेनेचा मुख्यमंत्री आणि भाजपाच्या उपमुख्यमंत्री राज्यात बसला होता. यावेळीही शिवसेनेने भाजपाला खिंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या निवडणुकीचा अनुभव चांगलाच गाठीशी असल्याने आधी विधानसभेच्या जागांचे बोला, मग लोकसभेचे ठरवू अशी भुमिका घेत सेनेने भाजपाला अडचणीत टाकले आहे.
जर 1995 चा फॉर्म्युला भाजपाने मान्य केल्यास शिवसेनेचा मुख्यमंत्री राज्यात करावा लागणार आहे. अन्यथा युती तुटल्यास याचा थेट फटका भाजपाला बसणार असून खासदारांची संख्या कमालीची घटणार आहे. देशभरात मित्रपक्षांसह मतदारही केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात जात आहेत. अशातच विरोधकांनी महाआघाडी केल्यास त्याचा फटका भाजपाला बसणार आहे. नुकत्याच झालेल्या सर्व्हेमध्ये भाजपला बहुमतापासून 30 ते 40 जागा कमी पडणार आहे. शिवाय उत्तर प्रदेशमध्येही कमालीची पिछेहाट होण्याचे संकेत मिळाले आहेत. यामुळे त्यापाठोपाठ जास्त जागा असलेले राज्य महाराष्ट्रही हातचे गेल्यास बहुमताची जुळलाजुळव करणे अशक्य होणार असल्याचे भाजपामध्ये बोलले जात आहे. यामुळे महाराष्ट्रात भाजपाला शिवसेनेचा प्रस्ताव मान्य करण्याशिवाय पर्याय राहणार नाही.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!