Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

रामदास आठवले यांना हव्यात लोकसभेच्या दोन जागा

Spread the love

लोकसभा निवडणुकीत रिपाइंला दोन जागा द्या, अशी मागणी रामदास आठवले यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना औरंगाबादच्या मेळाव्यात बोलताना केली. भाजप-शिवसेनेने युती केली पाहिजे आणि मला दोन जागा दिल्या पाहिजे. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेच्या कोट्यातील आहे. या जागेवरुन मला निवडून आणा. विधानसभा निवडणुकीत बारा जागा द्या, अशी जाहीर मागणी आठवले यांनी केली.
या मेळाव्यात आठवले यांनी वंचित बहुजन आघाडीवर टीका करीत राजकीय दिशा सांगितली. ‘आंबेडकरी पक्षांच्या ऐक्यासाठी तयार आहे. आता खालच्या लोकांनी चळवळ हाती घ्यावी. ऐक्याला विरोध करणाऱ्यांना वस्तीत न येऊ देण्याचा ठराव घ्या. ऐक्यासाठी मंत्रिपद सोडण्यात तयार आहे’ असे आठवले म्हणाले. ‘हमे नही चाहिए वो प्रकाश’ अशी कोटी करीत आठवले यांनी आंबेडकरी अनुयायांना ‘रिपाइं’सोबत येण्याचे आवाहन केले. मुस्लिम बांधवांनी ‘एमआयएम’कडे जाऊ नये. भाजप सरकार मुस्लिमविरोधी नाही, असे आठवले म्हणाले.
‘भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे चांगले बॅटस् मन असून मी चांगला बॉलर आहे. त्यामुळे २०१९ ची लोकसभेची मॅच जिंकल्याशिवाय राहणार नाही. राहुल गांधी यांनी ७०-८० रन काढावे. पण, त्यांना सेंच्युरी गाठू देणार नाही’ अशी उपरोधिक टीका केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केली. तसेच भाजपचा पुन्हा विजय होईल, असा विश्वास व्यक्त केला.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा मराठवाडा विभागीय मेळावा जबिंदा लॉन्स मैदानावर रविवारी पार पडला. या मेळाव्याला ‘रिपाइं’चे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, सीमा आठवले, जीत आठवले, आमदार अतुल सावे, ‘रिपाइं’चे प्रदेशाध्यक्ष बाबूराव कदम, मिलिंद शेळके, विजय मगरे, अरविंद अवसरमल, संजय ठोकळ, किशोर थोरात, दौलत खरात, राजा सरवदे, पप्पू कागदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
‘भाजपला जातीयवादी म्हणणारे आमच्या पंगतीत जेवून गेले आहेत. शरद पवार, मायावती, ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू असे सगळेच आहेत. या टिकेकडे लक्ष न देता आठवले यांना पाठिंबा द्या’ असे रावसाहेब दानवे म्हणाले. दरम्यान, औरंगाबाद विमानतळाचे नामकरण लॉर्ड बुद्धा करावे आणि भडकलगेट येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा १०० फूट करावा अशी मागणी करण्यात आली.
वंचित बहुजन आघाडीला आव्हान देण्यासाठी जबिंदा मैदानावर मोठा मेळावा घेण्याची घोषणा ‘रिपाइं’ने केली होती. वंचितच्या सभेला ७० ते ८० हजार नागरिक उपस्थित होते. पुरेशी तयारी करुनही ‘रिपाइं’च्या मेळाव्याला जेमतेम पाच हजार नागरिक उपस्थित होते. त्यामुळे हा जिल्हास्तरीय मेळावा आहे, असे काही पदाधिकाऱ्यांनी भाषणात सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!