Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

कॉ. पानसरे हत्येप्रकरणी पुरवणी आरोपपत्र दाखल

Spread the love

कॉ. पानसरे हत्येप्रकरणी पुरवणी आरोपपत्र दाखल

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येप्रकरणी एसआयटीने प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. राऊळ यांच्या कोर्टात पुरवणी आरोपपत्र दाखल केले. चारशे पानांच्या आरोपपत्रात आणखी चार संशयितांचा समावेश असून, ८५ साक्षीदारांच्या साक्षी आहेत. कर्नाटकातील गौरी लंकेश हत्येतील आरोपींचा पानसरे हत्येशी संबंध आढळल्याने विचारवंतांच्या हत्यांमागे अमोल अरविंद काळे (वय ३४, रा. पिंपरी चिंचवड, जि. पुणे), वासुदेव भगवान सूर्यवंशी (२९, रा. यावली, जि. जळगाव), भारत उर्फ भरत जयवंत कुरणे (३७, रा. महाद्वार रोड, बेळगाव) आणि अमित रामचंद्र डेगवेकर (३८, रा. कळणे, दोडामार्ग, जि. सिंधुदुर्ग) अशी आरोपपत्र दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. हे चौघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
सरकारी वकील शिवाजी राणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ फेब्रुवारी २०१५ मध्ये कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर झालेला हल्ला आणि हत्येप्रकरणी पोलिसांनी आजवर सहा संशयितांना अटक केली, तर आठ संशयितांवर आरोपपत्र दाखल केले. यातील समीर विष्णू गायकवाड, डॉ. वीरेंद्रसिंह शरदचंद्र तावडे, विनय बाबुराव पवार आणि सारंग दिलीप आकोलकर या चौघांच्या विरोधात १४ डिसेंबर २०१५ मध्ये आरोपपत्र दाखल केले आहे. यातील पवार व आकोलकर हे दोघे फरार आहेत. मुंबई आणि बेंगळुरू पोलिसांकडून ताबा घेतलेल्या आणखी चौघांवर शुक्रवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. राऊळ यांच्या कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आले.
गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार डॉ. वीरेंद्र तावडे यांना मदत करून कटात सामील होणे, खून करणे, खुनाचा प्रयत्न करणे, अवैध शस्त्र बाळगणे, विनापरवाना शस्त्रांचा वापर करणे, संगनमताने गुन्हा करणे असे आरोप या संशयितांवर लावले आहेत. चारही संशयितांचे जबाब, आधीच्या चार संशयितांशी असलेल्या संबंधाचे पुरावे, सर्व संशयितांनी एकमेकांना पाठवलेले ई-मेल्स, मोबाइल कॉल डिटेल्स, ८५ साक्षीदारांच्या साक्षींचा समावेश आरोपपत्रात आहे. संशयितांवरील गुन्हा सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेले सर्व पुरावे आरोपपत्रात असल्याची माहिती सरकारी वकील शिवाजी राणे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
संशयितांच्या अटकेनंतर ९० दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल केले जाते. पानसरे हत्येतील चार आरोपींना अटक केल्यानंतर ८९ व्या दिवशी आरोपपत्र दाखल करण्यात आले. आरोपपत्र तयार झाल्यानंतर सोमवारी सकाळी एसआयटी प्रमुख तिरुपती काकडे यांनी पथकासह पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांची भेट घेतली. दुपारी तीनपर्यंत त्यांची बैठक सुरू होती. यानंतर तपास अधिकाऱ्यांनी विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांची भेट घेऊन आरोपपत्राबाबत चर्चा केली. संध्याकाळी पाचच्या सुमारास आरोपपत्र दाखल करण्यात आले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!