Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

‘लष्कर’च्या दहशतवाद्याला अटक

Spread the love

वॉशिंग्टन : लष्करे तैयबा या दहशतवादी संघटनेत सामील होण्यासाठी अमेरिकेतून पाकिस्तानात निघालेल्या २९ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानला जाण्यासाठी विमान पकडण्याच्या तयारीत असताना त्याला अटक करण्यात आली. या घटनेवरून ‘लष्करे तैयबा’ या दहशतवादी संघटनेने अमेरिकेतही हातपाय पसरायला सुरुवात केल्याचे मानले जात आहे.
मुंबईवरील २६-११ दहशतवादी हल्ल्याची सूत्रधार असलेल्या ‘लष्करे तैयबा’ने अमेरिकेत कारवाया सुरू केल्याचे दर्शवणारी ही दुसरी घटना उघड झाली आहे. अमेरिकेतील तरुणांना सोशल मीडियाच्या माध्यमातून मूलतत्ववादाकडे आकर्षित करून त्यांना पाकिस्तानात प्रशिक्षणसााठी पाठवण्याचा आरोप एफबीआयने टेक्सासमधील किशोरवयीन मुलावर यापूर्वी ठेवला आहे. सरकारी वकिलांनी शुक्रवारी मॅनहॅटनमधील जिजस विल्फ्रेडो इनकार्नसियन याला अटक करण्याच आल्याचे जाहीर केले. जॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून गुरुवारी रात्री त्याला अटक करण्यात आली. पाकिस्तानला जाणारे विमान पकडत असतानाच त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
इनकार्नसियन उर्फ ‘जिहादीस्ट सोल्जर’, ‘जिहादीन हियर’, ‘जिहादीन हर्ट’ आणि ‘लायन ऑफ द गुड’ याला पाकिस्तानला जात असताना अटक करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. टेक्सासमधील १८ वर्षांच्या मायकल केली सेवेल या तरुणावर एफबीआयने आरोप ठेवले होते. मायकल सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांची भरती करून त्यांना पाकिस्तानमध्ये लष्करे तैयबाचे प्रशिक्षण घेण्यासाठी पाठवत असल्याचा आरोप आहे. या घटनांवरून अमेरिकी तरुणांना मूलतत्त्ववादाकडे आकर्षित करण्यासाठी दहशतवादी प्रयत्न करत असल्याचे समोर आले आहे. संयुक्त राष्ट्रे, तसेच अमेरिकेने लष्करे तैयबाला जागतिक दहशतवादी संघटना घोषित केले आहे. या संघटनेने भारतात अनेक दहशतवादी हल्ले घडवले आहेत. मुंबईवर लष्करे तैयबाने केलेल्या हल्ल्यात १६६ नागरिकांचा मृत्यू झाला होता. पाकिस्तानात जाऊन दहशतवादी प्रशिक्षण घ्यायचे आणि अमेरिकेत परत येऊन हल्ले घडवायचे, असा इनकार्निसियनचा हेतू असल्याचे न्यूयॉर्कचे पोलिस आयुक्त जेम्स ओ नेली यांनी सांगितले. दरम्यान, सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांची दहशतवादी संघटनांत भरती करणाऱ्या सेवेल याने इनकार्निसियन याची भेट घेतल्याचेही उघड झाले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!