देवेंद्र फडणवीस यांची बारामतीवर नजर !!

Spread the love

यावेळी बारामतीसह ४३ जागा जिंकण्याचा विश्वास

आगामी लोकसभा निवडणुकीत ४८ जागा लढवणार आहोत. मागच्यावेळी ४२ जागा जिंकल्या होत्या. यावेळी ४३ जागा जिंकू. ही ४३ वी जागा बारामती असेल. बारामतीमध्ये कमळ फुलवू अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. पुण्यातील गणेश कला क्रिडा रंगमंच येथे भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह पुणे, शिरुर आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील शक्ती केंद्र प्रमुखांना लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आले होते.

त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे,पालकमंत्री गिरीश बापट, पुणे शहराचे खासदार अनिल शिरोळे, शहर अध्यक्ष योगेश गोगावले तसेच आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस म्हणाले की, मागील निवडणुकीत थोड्या मताने बारामतीमधील जागा गेली. मात्र यंदाच्या निवडणुकीत बारामती मध्ये भाजपची जागा निवडून येणार. शिरुर आणि मावळ मधील जागा भाजप जिंकणार असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले की, देशात काही जण मुलाचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांनी नाव न घेता सोनिया गांधी यांच्यावर टीका केली

नवाब मलिक यांचा मोदी- फडणवीस यांना टोला

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी शनिवारी पुण्यात आले होते. यावेळी गणेश कला क्रिडा रंगमंच येथे बोलताना त्यांनी तुम्ही मला महाराष्ट्रातून ४५ जागा निवडून दिल्यास जे घुसखोर आहेत त्यांना पळून लावू आणि ४५ वी जागा बारामतीची असेल असे म्हणाले. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी उपरोधिक टीका केली आहे. अमित शाह म्हणाले महाराष्ट्रात ४५ जागा निवडून आणू आणि ४५वी जागा #बारामती असेल. ४८ पैकी ४५ बोलले हे बरं, नाहीतर ५० सांगायलाही कमी केलं नसतं. आता बारामतीला भाजपाचा उमेदवार कोण? मोदी, शाह की देवेंद्र? जाहीर करा ! असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *