Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

राफेल : पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला

Spread the love

राफेल सौद्यात मोदींचा प्रत्यक्ष सहभाग: राहुल

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राफेल करारावरून पुन्हा एकदा जोरदार हल्ला चढवला आहे. राफेल घोटाळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी ‘द हिंदू’ या वर्तमानपत्रात आलेल्या बातमीच्या हवाल्याने केला आहे. पंतप्रधान या कराराबाबत समांतर बोलणी करत होते, या वर्तमानपत्रात छापून आले असून त्यावरून त्यांचा प्रत्यक्ष सहभाग सिद्ध होत असल्याचे राहुल म्हणाले. देशातील युवक, हवाईदल आणि लष्करातील जवानांना उद्देशून राहुल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पंतप्रधान मोदी यांनी हवाईदलाचे ३० हजार कोटी रुपये चोरून ते त्यांचे मित्र अनील अंबानी यांना दिले या आरोपांचा पुनरुच्चारही राहुल यांनी पत्रकार परिषदेत केला.

पंतप्रधान कार्यालयाकडून राफेल कराराबाबत समांतर बोलणी सुरु असल्याचे सांगत संरक्षण मंत्रालयाने समांतर बोलणी प्रक्रियेवर आक्षेप नोंदवला होता. २४ नोव्हेंबर २०१५ रोजी उपसचिव एस. के. शर्मा यांनी तसे पत्र लिहून हा आक्षेप नमूद केला आहे. पंतप्रधान कार्यालयाने समांतर बोलणी केल्याने राफेल करार कमकुवत होत असून हे अतिशय गंभीर असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. ‘दं हिंदू’ या वर्तमानपत्राने हे पत्र छापले आहे. हे पत्र पत्रकार परिषदेत सादर करून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राफेल घोटाळ्यात सहभागी आहेत हे आपण गेल्या वर्षभरापासून सांगत आहोत, आणि आज तेच ‘द हिंदू’ या वर्तमानपत्रात छापून आले आहे, याकडे राहुल यांनी लक्ष वेधले. हवाईदलाच्या जवानांना उद्देशून राहुल पुढे म्हणाले की, तुम्ही आमच्यासाठी लढता आणि प्राण देखील देता, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुमचेच ३० हजार कोटी रुपये चोरले आणि ते त्यांचे मित्र अनील अंबानी यांना दिले. ही गोष्ट स्फटिकासारखी स्पष्ट असल्याचेही ते म्हणाले. या संपूर्ण प्रकरणाची व्यवस्थित चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही राहुल यांनी पत्रकार परिषदेत केली.

उद्योगपती अनील अंबानी यांना कंत्राट मिळाले पाहिजे हा पंतप्रधान मोदी यांचा आग्रह होता असे संरक्षण मंत्रालयाकडून स्पष्ट झाले असल्याचेही राहुल म्हणाले. अनील अंबानीना कंत्राट मिळायला हवे असे ऑलँद यांनी देखील म्हटले होते, असे राहुल म्हणाले. शिवाय, या कराराबाबत पंतप्रधान मोदी थेट फ्रान्सशी बोलणी करत आहेत असे हवाईदल आणि संरक्षण मंत्रालयाचे लोकच सांगतात. यावरून ‘चौकीदार चोर हैं’ हेच सिद्ध झाल्याचे राहुल यांनी म्हटले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!