Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

काँग्रेसचे महाभारत : राहुल राम तर मोदी रावण !!

Spread the love

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी एक दिवसीय मध्य प्रदेश दौरा आयोजित केला आहे. दौऱ्यादरम्यान ते भोपाळमध्ये एका जाहीर सभेत शेतकऱ्यांना संबोधित करणार आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांनी राहुल यांच्या स्वागतासाठी भोपाळमध्ये ठिकठिकाणी पोस्टर्स लावली आहेत. विशेष म्हणजे या पोस्टर्सवर राहुल गांधी यांना भगवान रामाच्या अवतारात दाखवण्यात आले आहे, तर पंतप्रधान मोदी हे दहा तोंडे असलेले रावण दाखवण्यात आले आहेत. पोस्टरवर ‘चौकीदार चोर हैं’ असा उल्लेख असून राहुल गांधी हेच राम मंदिर बनवतील असा मजकूरही लिहिण्यात आला आहे.

या पोस्टरमध्ये भगवान राम दाखवण्यात आलेल्या राहुल गांधी यांच्या हातात ताणलेले धनुष्य दाखवण्यात आले आहे. त्यांनी रावण दाखवण्यात आलेल्या पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधल्याचे पोस्टरमध्ये दिसत आहे. पोस्टरवर लिहिले आहे- ‘ चोरों तुम्हारी खैर नहीं, हम राम भक्त है. चोरों के अलावा किसी से बैर नहीं’ या पोस्टरमध्ये राफेल मुद्दा उचलण्यात आला आहे. अशाच प्रकारचे आणखी एक पोस्टर भोपाळमध्ये लावण्यात आले आहे. यात राहुल गांधी यांच्यासोबत मुख्यमंत्री कमलनाथ यांचा फोटो लावण्यात आला आहे. ‘सर्वांच्या संमतीने अयोध्येत राम मंदिर बनवू. अशा रामभक्त राहुल गांधी यांचे तलावांची नगरी भोपाळमध्ये स्वागत’, असा मजकूर या पोस्टरवर लिहिण्यात आला आहे.

काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी लावले पोस्टर

ही पोस्टर्स काँग्रेस पक्षाने लावलेली नसून काही उत्साही कार्यकर्त्यांनी लावली आहेत असे प्रदेश काँग्रेस मीडिया विभागाचे समन्वयक नरेंद्र सलुजा यांनी स्पष्ट केले आहे. काँग्रेसचा धर्माच्या राजकारणावर विश्वास नाही, असेही सलुजा म्हणाले. काँग्रेसच्या सॉफ्ट हिंदुत्वाबाबत विचारले असता सलुजा यांनी मात्र मौन बाळगले. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी भोपाळच्या जंबोरी मैदानात सुमारे २ लाख शेतकऱ्यांना संबोधित करणार आहेत. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी राम मंदिर मुद्द्यावर काँग्रेसवर आरोप केल्यानंतर हे पोस्टर समोर आले आहे. काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि बीएसपीमध्ये जर हिम्मत असेल तर त्यांनी राम मंदिर प्रकरणी आपली भूमिका जाहीर करावी असे आवाहन अमित शहा यांनी अलिगडमध्ये म्हटले होते.

‘काँग्रेसने अधिकृत घोषणा करावी’

पोस्टरमध्ये कशाला, ते राम मंदिर उभारणार आहेत असे काँग्रेसने अधिकृतपणे जाहीर करावे, असे भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रभात झा यांनी म्हटले आहे.  काही दिवसांपूर्वी बिहारमधी पाटणा येथील कांग्रेसच्या सभेत राहुल गांधी यांना भगवान रामाच्या रुपात दाखवणारे पोस्टर झळकले होते. पोस्टरद्वारे भाजपवर टीकाही करण्यात आली होती. ‘वे राम नाम जपते रहे, तुम बनकर राम जियो रे’, असा मजकूर पोस्टरवर लिहिण्यात आला होता.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!