राज्य शासनाचे सांस्कृतिक पुरस्कार जाहीर

Spread the love

मुंबई : सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवर व्यक्तींना राज्य सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदाच्या राज्य सांस्कृतिक पुरस्कारांच्या घोषणेचा शासन निर्णय आज प्रसिद्ध करण्यात आला.

नाटक, कंठसंगीत, उपशास्त्रीय संगीत, मराठी चित्रपट, किर्तन, शाहिरी, नृत्य, आदिवासी गिरीजन, कलादान, वाद्यसंगत, तमाशा, लोककला या क्षेत्रात विशेष कामगिरी केलेल्या कलाकारांना प्रतिवर्षी राज्य सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. सन १९७६ पासून सदरील पुरस्कारांचे वितरण करण्यात येत आहे. या पुरस्कारासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री, श्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील गठित समितीने २०१८ च्या पुरस्कारांसाठी खालील मान्यवरांची शिफारस केली होती.

पुरस्काराचे रु. १ लाख रोख, मानचिन्ह व प्रमाणपत्र असे स्वरुप असून नाटक विभागासाठी श्री रवी पटवर्धन, कंठसंगीतासाठी, श्रीमती माधुरी विश्वनाथ ओक, उपशास्त्रीय संगीतासाठी श्री. श्याम देशपांडे, मराठी चित्रपटासाठी श्रीमती उषा नाईक, कीर्तनासाठी ह.भ.प.विनोदबुवा खोंड, शाहिरीसाठी शाहीर विजय जगताप, नृत्यासाठी श्रीमती माणिकबाई रेंडके, आदिवासी गिरीजनसाठी श्रीमती वेणू बुकले, वाद्यसंगीतासाठी पं.प्रभाकर धाकडे, तमाशासाठी श्रीमती चंद्राबाई अण्णा आवळे, लोककलेसाठी श्री मोहन कदम आणि कलादानसाठी श्री. श्रीकांत धोंगडे  यांना हा पुरस्कार जाहिर झालेला आहे.  पुरस्कार प्राप्त सर्व कलाकारांचे सांस्कृतिक कार्य मंत्री, श्री विनोद तावडे यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *