पॉप गायक रॉडनी फर्नांडिस फसवणूक : मयूर अग्रवालला बेड्या

Spread the love

मुंबई – प्रसिद्ध पॉप गायक रॉडनी फर्नांडिस व त्याच्या बॅंडमधील ९ सदस्यांची सुमारे 18 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने (इओडब्ल्यू) मयूर अग्रवाल या संशयिताला अटक केली आहे. “फाईंडिग फॅनी’ व अन्य चित्रपटांसाठी गायन केलेल्या रॉडनीला गुंतवणुकीवर 18 ते 22 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते.

रॉडनी एंटरटेन्मेंट या बॅंडचा प्रमुख गायक असलेल्या रॉडनीच्या तक्रारीनुसार, 2015 साली त्याची ओळख मयूर अग्रवाल याच्यासोबत झाली. त्याने गुजरातमधील मामा संजय अग्रवाल याच्यामार्फत जमिनीत पैसे गुंतवून 18 ते 22 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवले. त्यानुसार ऑक्‍टोबर 2015 सालापासून रॉडनीने त्याच्याकडे गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. रॉडनीने पूर्वी खरेदी केलेल्या सोन्याचीही अग्रवालकडे गुंतवणूक केली, असे एकूण 15 कोटी 60 लाख रुपये 2018 पर्यंत अग्रवालकडे जमा करण्यात आले. अग्रवालने 2016 पर्यंत रॉडनीला नियमित व्याजाचे पैसे दिले. त्यामुळे त्याच्या बॅंडमधील ९ सदस्यांनीही अग्रवालकडे सुमारे २ कोटी 15 लाख रुपये गुंतवले.

मयूर अग्रवालने 2017 साली व्याजाची रक्कम देण्यास टाळाटाळ सुरू केली. त्यानंतर रॉडनीने पाठपुरावा केल्यावर त्याने मामाकडे दिलेली रक्कम गोरेगावमधील एका कंपनीत गुंतवल्याचे सांगितले. रॉडनीने गोरेगाव येथे संजय अग्रवालची भेट घेतली. सुरतमध्ये जमिनीत सुमारे आठ कोटी रुपये गुंतवल्याचे त्याने सांगितले. मयूरने पुण्यातील मित्र नितीन लोहारिया याच्याकडे सहा कोटी रुपये गुंतवल्याचे सांगितले. रॉडनीने वांद्रे येथे लोहारिया याची भेट घेतली असता. त्याने शेअर बाजारात पैसे गुंतवल्याचे व फक्त दोन कोटी रुपये वांद्रे येथील मित्र संजय बंगेरा याला दिल्याचे सांगितले. त्यानुसार रॉडनीने बंगेरा यांच्याशी संपर्क साधला; मयूरने पैसे दिल्याचे त्यानेही सांगितले. व्याजाची रक्कम मिळणे 2017 नंतर बंद झाल्यामुळे रॉडनी व त्याच्या सहकलाकारांनी 17 कोटी 77 लाखांची फसवणूक झाल्याची तक्रार आर्थिक गुन्हे शाखेकडे केली. त्यानुसार संजय अग्रवाल, मयूर अग्रवाल, संजय बंगेरा व नितीन लोहारिया यांच्याविरोधात 25 फेब्रुवारीला फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यावरून पोलिसांनी मयूर अग्रवालला बुधवारी बेड्या ठोकल्या आहेत.